रणजितदादांच्या हस्ते फलटणच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये ६४.७४ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन; नागरिकांनी उपस्थित रहावे : सौ. सुपर्णा अहिवळे

फलटणच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये रस्ते, काँक्रिटीकरण व बंदिस्त गटाराच्या ६४.७४ लाखांच्या पाच विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी होणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑगस्ट : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधील सुमारे ६४ लाख ७४ हजार रुपये खर्चाच्या पाच विविध विकासकामांचे भूमिपूजन उद्या (गुरुवार, दि. २७) सकाळी १०.३० वाजता मंगळवार पेठेतील पूजा किराणा स्टोअर येथे होणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर स्वागताध्यक्ष राहणार आहेत.

रस्ते, काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटाराची कामे

प्रभाग क्रमांक २ मध्ये अमोल अहिवळे यांच्या घरापासून राहुल सोनवणे यांच्या घरामार्गे महेश जगताप यांच्या घरासमोरील स्वच्छतालयापर्यंत २५ लाख रुपये खर्चातून काँक्रीट रस्ता करण्यात येणार आहे. पूजा किराणा स्टोअर ते महेश जगताप यांच्या घरापर्यंत १४ लाख ७१ हजार रुपये खर्चातून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

प्रमोद काकडे यांच्या घरापासून जुन्या बारामती रस्त्यापर्यंत ४ लाख ४६ हजार रुपये खर्चातून सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. तूक्षण काकडे यांच्या घरापासून वैभव मोहिते यांच्या घरापर्यंत ११ लाख ६० हजार रुपये खर्चातून बंदिस्त गटर, पाइपलाइन व इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. तसेच कतार गल्ली अंतर्गत ८ लाख ९७ हजार रुपये खर्चातून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या पाचही कामांची एकत्रित किंमत ६४ लाख ७४ हजार रुपये आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन

या भूमिपूजन कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी फलटणच्या उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी भोसले, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सोमशेठ जाधव, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोहिनी हेंद्रे आणि फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव उपस्थित राहणार आहेत.

सुपर्णा अहिवळे यांचे उपस्थितीचे आवाहन

प्रभाग क्रमांक २ मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीच्या सभापती सुपर्णा अहिवळे यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!