दैनिक स्थैर्य | दि. १३ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण ग्रामीण भागामध्ये शेतीपंपांची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून शेतीपंपांचे ६ गुन्हे उघडकीस आणून एकूण ४,४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे.
ओंमकार संतोष मदने (रा. १७ फाटा, निमरे, ता. फलटण), विजय सुखदेव जाधव (रा. सुरवडी, ता. फलटण), ओंमकार शरद लोंढे (रा. सुरवडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात रोहित राजेंद्र शिंदे, रा. सुरवडी ता. फलटण, जि. सातारा यांनी त्यांची ५ एच.पी. पावरची पाण्याची विद्युत मोटार चोरीस गेल्याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
शेतीपंपांच्या चोरीबाबत गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी गोपनीय माहिती काढल्यावर गुन्ह्यात ३ आरोपींचा सहभाग असल्याबाबत माहिती मिळाल्यावर वरील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींकडे तपास केल्यावर त्यांनी सुरवडी व फडतरवाडी भागामध्ये शेतीपंपांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीचे ६ शेतीपंप, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल व दोन मोबाईल असा एकूण ४,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू असून अटक आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विशाल वायकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने, सहा. पोलीस फौजदार हजारे, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पो. हवा. महादेव पिसे, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी केली.