दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण आगाराकडून ‘अष्टविनायक दर्शन’ यात्रेतील तिकिट विक्रीत अपहार झाल्याची तक्रार पुणे विभागातील तिकिट तपासणी अधिकार्यांकडून दाखल झाल्यानंतर याबाबत फलटण आगाराच्या अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवी केली आहे. त्यामुळे ‘अष्टविनायक दर्शन’ यात्रा तिकिट विक्रीत मोठा अपहार झाल्याच्या शक्यतेस दुजोरा मिळत आहे. त्यामुळे फलटण आगारातील अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळास आपल्या भ्रष्ट कारभाराने लुटत आहेत का? असा सवाल प्रवाशांतून विचारला जात आहे.
याबाबत माहिती अशी, ९ सप्टेंबर २०२३ ते १० सप्टेंबर रोजी फलटण आगारातून ‘अष्टविनायक दर्शन यात्रा’ मार्गस्थ झाली होती. यासाठी ढवळ गावातून एक बस, साखरवाडी एक बस व फलटण शहरमधून दोन बसेस गेल्या होत्या. या चार बसपैकी तीन बस पहाटे ५ वाजता अष्टविनायकसाठी मार्गस्थ झाल्या तर एक बस सकाळी ७.३० वाजता मार्गस्थ झाली.
रांजणगाव ते नारायणगावच्या दरम्यान या अष्टविनायक यात्रा बसेस पुणे विभागाच्या अधिकार्यांनी तपासल्या असता सदर बससाठी कोणतेही तिकिट नव्हते. या सर्व बसेसमधील प्रवाशांच्या तिकिटाबाबत तपासणी अधिकार्यांनी बसचालकांची चौकशी केली असता चालकांकडेसुध्दा तिकिटे अथवा परवाना/करार मिळाला नाही. त्यामुळे या चालकांवर तपासणी अधिकार्यांनी तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर हे समजताच फलटण आगारातील अधिकार्यांनी दि. १० सप्टेंबर रोजी तळेगाव ते राजगुरूनगरच्या दरम्यान प्रवाशांना तिकिटे देण्याची व्यवस्था केली.
या बसेस फलटणला आल्यावर आगारात जमा न करता बसस्थानक परिसरात उभ्या करण्यात आल्या. याची माहिती पत्रकारांनी मागितली असता फलटण आगाराच्या अधिकार्यांनी टोलवाटोलवी केली.
यापूर्वीसुध्दा फलटण आगारामध्ये मालवाहतूक करणार्या गाड्यांच्या पैशांचा अपहार केला असल्याची चर्चा सुरू आहे.