‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा प्रथम क्रमांक


दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२४ | फलटण |
‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा पुणे प्रदेश स्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. या अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल बसस्थानकास बक्षीस म्हणून १० लाख रुपये मिळाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियान राबवले गेले. त्यामध्ये बसस्थानकावरील येणार्‍या जाणार्‍या बस फेर्‍यांनुसार बसस्थानकाचे ‘अ’ ‘वर्ग’, ‘ब’ वर्ग व ‘क’ वर्ग बसस्थानक अशी विभागणी करण्यात आली होती. या अभियानात दर ३ महिन्यांनी एक असे एकूण चार सर्वेक्षण फेर्‍यांमधून बसस्थानकाचे विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत गुण मूल्यांकन करण्यात आले. या गुण मूल्यांकनात बसस्थानकाची स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रवासी वाढीसाठी केलेले सकारात्मक प्रयत्न, बसस्थानकातील टापटीपपणा, रा. प. गणवेशातील सर्व कर्मचारी, स्वच्छ सुलभ शौचालय, प्रवाशांकरिता सर्व सोयीसुविधांयुक्त नियोजन, स्वच्छ व टापटीप बसेस, योग्य वेळेत बसेसची वारंवारीता, अवैध प्रवासी वाहतुकीला नियमित आळा घालून रा. प. प्रवासी उत्पन्न वाढविणे, प्रवासी व कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येक महिन्यात नामांकित डॉक्टरांमार्फत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांचे आयोजन तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व स्थानिक पत्रकार यांच्या अभिप्रायांनुसार बसस्थानकाचे गुण मूल्यांकन करण्यात आले आणि ही सर्व आव्हाने पार करत व प्रवाशांना दर्जेदार सुविधा देत फलटण बसस्थानकाने पुणे प्रदेशात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

सदर अभियानात रा. प. सातारा विभागातील फलटण बसस्थानक हे पुणे प्रदेशातील एकूण १३३ बसस्थानकांपैकी ३४ ‘अ’ वर्ग बसस्थानकांशी स्पर्धा करत पुणे प्रदेशातील म्हणजेच सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे या विभागात प्रथम क्रमांक मिळवून १० लाख रुपयांच्या बक्षिसास पात्र ठरले आहे.

तत्कालीन प्रभारी आगार व्यवस्थापक श्री. रोहित नाईक, नूतन आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला यांनी सदर अभियानात मोलाची कामगिरी करणारे फलटण आगारातील सर्व चालक, वाहक, कार्यशाळा, सफाईगार, स्वच्छक, पर्यवेक्षक, कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी या सर्वांचे अभिनंदन केले व भविष्यातही फलटण आगार प्रवाशांना दर्जेदार सोयी सुविधा पुरवेल व कायम अव्वल स्थानावर राहील, अशी सदिच्छा व्यक्त केली.

आगारातील सर्व कर्मचार्‍यांच्या उत्कृष्ट नियोजनत्मक सांघिक कामगिरीमुळेच हे यश साध्य करण्यात आले असून याचे सर्व श्रेय फलटण आगारातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींना जाते, असे सोफिया मुल्ला यांनी म्हंटले आहे.


Back to top button
Don`t copy text!