
शहरातील रस्ते ६ महिन्यांत सुधारू, येत्या १ महिन्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, अशी ग्वाही फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
स्थैर्य, फलटण, दि. 27 एप्रिल : “शहरातील रस्ते ६ महिन्यांत सुधारू असा शब्द आम्ही दिलेला आहे. त्यानुसार येत्या १ महिन्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असून, मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्तेही तुम्हाला नक्कीच खड्डेमुक्त दिसतील,” अशी ठाम ग्वाही फलटण शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मा. श्री. रवींद्र बेडकिहाळ यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शंकर मार्केट परिसरातील ‘लोकजागर’ कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये “सध्या फलटणकरांना खराब रस्त्यांचा खूप त्रास सहन करावा लागत आहे,” अशी खंत बेडकिहाळ यांनी निदर्शनास आणून दिली. यावर बोलताना नगराध्यक्षांनी शहरातील रस्ते सुधारणेबाबतचा वरील विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, भाजप गटनेते रोहित नागटिळे, पत्रकार प्रसन्न रुद्रभटे आणि रोहित वाकडे आदी उपस्थित होते.
‘माझ्या सहीअभावी सर्वसामान्यांचे काम थांबू नये’:
नगरपालिका प्रशासनाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “गेल्या ४ महिन्यांच्या कार्यकाळात मी केवळ ८ दिवस सुट्टी घेतली आहे. माझ्या सहीवाचून सर्वसामान्यांचे कोणतेही काम थांबू नये किंवा त्यांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मी कटाक्षाने काळजी घेत आहे. प्रसंगी जनतेच्या कामांसाठी रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज सुरू असते.”
शहराच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन:
शहराच्या पुढील सर्वांगीण विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “शहरातील वाढती वाहतुकीची कोंडी सोडवणे, भाजी मंडईचे योग्य नियोजन करणे, वाचनालय, अद्ययावत अभ्यासिका आणि पत्रकारांसाठी एक सुसज्ज सभागृह उभारणे, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेकडून वेगाने काम सुरू आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि वारकरी शिक्षणासाठीच्या आवश्यक सोयी-सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील.”
‘सहकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित’:
“मी माझ्या प्रत्येक सहकाऱ्याला त्यांच्या क्षमतेनुसार कामाची विभागणी करून दिली असून, प्रत्येक जण आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत आहे,” असे सांगत नगराध्यक्षांनी रवींद्र बेडकिहाळ यांच्यासारख्या अभ्यासू आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन पालिका प्रशासनाला यापुढेही सतत मिळत राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
