साखरवाडीत डीजेला फाटा देत शिवजयंतीनिमित्त ‘फोक प्रबोधन’चा जागर; तीन तास रंगलेल्या कार्यक्रमात महिलांची विक्रमी उपस्थिती!


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साखरवाडी येथे आयोजित ‘फोक प्रबोधन’ कार्यक्रमाने तालुक्यात नवा आदर्श उभा केला आहे. लोकवर्गणीतून झालेल्या या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

स्थैर्य, साखरवाडी, दि. 27 एप्रिल : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साखरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फोक प्रबोधन’ या कार्यक्रमाने संपूर्ण तालुक्यात एक मोठा सांस्कृतिक जागर घडवून आणला आहे. डीजे आणि गोंगाटाला फाटा देत तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला साखरवाडी आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी, विशेषतः महिलांनी विक्रमी उपस्थिती लावत हा कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी केला.

पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन:

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार व पोलीस हवालदार महादेव पिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

हास्यकल्लोळ आणि भावनिक साद:

सायंकाळी साडेसहा वाजता नियोजित असलेला हा कार्यक्रम रात्री आठ वाजता सुरू होऊन तब्बल अकरा वाजेपर्यंत रंगला. जवळपास तीन तास चाललेल्या या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांनी एक क्षणही आपली जागा सोडली नाही. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे कार्यक्रमात अनेक वेळा हास्यकल्लोळ उसळला, तर काही प्रसंगी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाल्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रूही तरळले.

महिलांची लक्षणीय उपस्थिती हेच यश:

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची प्रचंड आणि विक्रमी उपस्थिती. साखरवाडी तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या होत्या. पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांचा एवढा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळणे ही एक दुर्मीळ बाब ठरली असून, यामुळे कार्यक्रमाची रंगत आणि ऊर्जा अधिकच वाढली.

डीजेला फाटा, लोकपरंपरेचे दर्शन:

सध्या जयंती उत्सवांमध्ये डीजे, फटाक्यांची आतषबाजी आणि मोठ्या आवाजाचा गोंगाट यावर भर दिला जात असताना, साखरवाडीत मात्र एक वेगळा आदर्श उभा राहिला. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देत, नव्या पिढीपर्यंत संस्कार पोहोचविण्याचा संदेश यातून देण्यात आला. पहाटेच्या पिंगळ्यापासून ते तमाशातील लावणीपर्यंतच्या विविध लोकपरंपरांचा प्रभावी आविष्कार या कार्यक्रमात पाहायला मिळाला. यामध्ये तालुक्यातील जिंती, विडणी, चौधरवाडी, गुणवरे परिसरातील युवा कलाकारांनी सहभाग घेऊन लोकसंस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे सशक्त चित्रण केले.

राजकीय आश्रयाविना, लोकवर्गणीतून उपक्रम:

विशेष म्हणजे, हा संपूर्ण कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाच्या आश्रयाशिवाय, केवळ शिवप्रेमी व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून साकारण्यात आला. ‘शिवजन्मोत्सव सोहळा समिती’च्या शिलेदारांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

साखरवाडीतील या ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रमाने सामाजिक माध्यमांच्या प्रभावामुळे विस्मरणात जात असलेल्या पारंपरिक खेळ-कलांना खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. अशा प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रत्येक गावात व्हावेत, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!