सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतून तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराला फलटण शहर पोलिसांकडून जेरबंद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या तौसीफ ऊर्फ छोट्या अब्दुल शेख या सराईत गुन्हेगाराला फलटण शहर पोलिसांनी गजानन चौक परिसरातून शिताफीने जेरबंद केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २७ एप्रिल :संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत संशयित गुन्हेगाराला फलटण शहर पोलिसांनी गजानन चौक परिसरातून शिताफीने जेरबंद केले आहे. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन चौक परिसरातून केली अटक:

तौसीफ ऊर्फ छोट्या अब्दुल शेख (वय ३२ वर्षे, रा. गोल्डन बेकरी पाठीमागे, गजानन चौक, फलटण) असे या कारवाईत जेरबंद करण्यात आलेल्या संशयित इसमाचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील एक तडीपार इसम गजानन चौक परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गजानन चौक येथे जाऊन शोध घेतला असता, संशयित तौसीफ शेख हा त्याच्या राहत्या घराजवळ मिळून आला.

त्याला संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आले होते. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात फिरत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले व त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली.

कारवाईतील पोलीस पथक:

ही धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि फलटण शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार बारेला, पोलीस हवालदार संतोष नाळे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके यांनी सहभाग घेतला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!