
दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । सातारा । राज्यात अद्यापही मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी वाढे येथे आयोजित शेतकरी संवाद व शिवार बैठकीवेळी केले. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सातारा जिल्हा कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन खरीप हंगाम नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
अपूरा पाऊस पडल्यानंतर पेरणी केली आणि पाऊस लांबला तर बियाणे, खते, मजूरी इ. सर्व खर्च शेतकऱ्यांचा वाया जातो. हवामान वेधशाळेने येत्या तीन दिवसानंतर राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांनी पुरेसा म्हणजेच तीन दिवसांत किमान 70 ते 100 मि.मी. इतका पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
सातारा जिल्हा हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यातील शेतकरी हा शेतीवर जीवापाड प्रेम करणारा आहे. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा आहे. या माध्यमातून उत्पादनामध्ये वाढ कशी होईल अशा प्रकारे नियोजन करणारा शेतकरीवर्ग सातारा जिल्ह्यात आहे.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने सातारा जिल्हा कृषी विभागाने खते, बियाणे, किटकनाशके इ. निविष्ठांचे योग्य नियोजन केलेले आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व भेसळरहित कृषी निविष्ठा मिळतील यादृष्टीने भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. जर कोणत्याही निविष्ठा विक्रेत्याने किंवा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली तर त्यांची गय केली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्या कृषी सेवा केंद्र किंवा कंपनीवर फौजदारी स्वरुपाची कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी दिला. बियाणांची कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नाही यादृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
स्टॉबेरी, वाघ्या घेवडा या सातारा जिल्ह्यातील पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त असून ही पिके विदर्भ, मराठवाड्यात कशा प्रकारे नेता येतील यादृष्टीने आपल्याला नियोजन करावे लागेल. कोरोना काळात देखील शेतकरी डगमगला नाही. त्याने आपले काबाडकष्ट नियमित सुरु ठेवले आणि त्यामुळे कोरोना काळात देखील भाजीपाला, फळे, दूध इ. जीवनावश्यक बाबींचा कुठेही तुटवडा भासला नाही. मा. मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना अन्नदेवता संबोधतात. अशा या अन्नदेवतास कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्याने कृषी विभाग असेल, इतर संलग्न विभाग असतील किंवा कृषी मंत्री म्हणून मला देखील संपर्क केला तरी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण केले जाईल अशी ग्वाही यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
शेडनेटमध्ये फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरु असून लवकरच त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल. असे सांगुन कृषी मंत्री श्री. भुसे यांनी येत्या खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बांधवांना तसेच कृषीसह इतर सर्व संलग्न विभागांना शुभेच्छा दिल्या.