‘ई-पीक पाहणी’ अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांनी आपला पीक पेरा लवकर नोंदवावा – प्रांताधिकारी सचिन ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यात ‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांना आपला पीक पेरा स्वत:हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल अ‍ॅपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी व चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांश व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

पीक पाहणीसाठी आज सर्व तालुक्यात सर्कल, नायब तहसीलदार, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, आणि प्रांत सचिन ढोले गावोगावी दौरे करत आहेत. खरीप हंगाम २०२३-२४ साठी मोबाईल अ‍ॅपद्वारे ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ आहे. सर्व मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यासाठी जागरूकता निर्माण करत आहेत.

मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी (व्हर्जन २.०.०१२) डाऊनलोड करून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी. काही अडचणी आल्यास संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.

ई-पीक पाहणीचा उद्देश :
१) कृषी पतपुरवठा सुलभ करणे.
२) पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे.
३) नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे.
४) शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने ई-पीक पाहणी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
५) शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने ई-पीक पाहणी अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!