दिल्ली सीमेवरील शेतकरी आज शहीद दिन साजरा करतील, आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होतील


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२०: दिल्लीला लागून असलेल्या हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस आहे. सरकार आणि शेतकरी या दोघांकडून कोणताही पुढाकार न घेतल्यामुळे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. सध्या येथे कोणतीही मोठी हालचाल होत नसून तीन नवीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन नेहमीप्रमाणे सुरू आहे.

या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील रकाबगंज साहेब गुरुद्वारात पोहोचले. येथे ते नतमस्तक झाले. त्यांची भेटी पूर्वनियोजित नव्हती. ते अचानकपणे गुरुद्वारात पोहोचले.

दुसरीकडे कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आज शहीद दिवस पाळणार आहेत. या दरम्यान आंदोलनस्थळी आणि संपूर्ण पंजाबमध्ये शहीद शेतकऱ्यांचा श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. अनेक विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत. भारतीय किसान युनियनचे मुख्य सचिव राम त्यागी यांनी ही माहिती दिली.

सिंघू सीमेवर पगडीचे लंगर

पंजाबहून आलेल्या स्वयंसेवकांच्या एका ग्रुपने सिंघू बॉर्डरवर पगडी लंगर सुरू केले आहे. येथे शेतकऱ्यांना मोफत पगडी बांधली जात आहे. स्वयंसेवक त्यांच्याबरोबर पगही घेऊन आले आहेत. ते देखील विनामूल्य देत आहेत. पगडी कशी बांधली जाते हे आम्ही लोकांना सांगत असल्याचे ते म्हणाले.

आंदोलन स्मरणात रहावे यासाठी शेतकऱ्यांना मोफत टॅटू

पंजाबच्या एका टॅटू आर्टिस्टने आंदोलनस्थळी स्टॉल लावला आहे. येथे शेतकऱ्यांना मोफत टॅटू गोंदवून दिले जात आहेत. टॅटू बनवणारे रविंद्र सिंग म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा या मागचा उद्देश आहे. यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचा स्मरणात राहील.

रविंद्र सांगतात की, मी लुधियानाहून आलो असून शेतकऱ्यांच्या हातावर टॅटू गोंदत आहे. हे देखील त्यांना पाठिंबा देण्याचा एक प्रकार आहे. आतापर्यंत 30 शेतकऱ्यांच्या हातावर टॅटू गोंदले आहेत. त्यापैकी बर्‍याच जणांनी ट्रॅक्टर, पिके, पंजाबचा नकाशा व प्रेरक कोट बनविला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!