प्रतिवर्षीप्रमाणे शनिनगर येथे रंगणार पारंपरिक नागपंचमी उत्सव; दिमाखदार सोहळ्याचे आयोजन; नगरपालिकेची माहिती

दैनिक स्थैर्य, दि. 15 ऑगस्ट 2026, फलटण : श्रावण महिना आणि सण-उत्सवांची रेलचेल यात महिलांचा सर्वात जिव्हाळ्याचा व आनंदाचा सण म्हणजे ‘नागपंचमी’. या दिवशी महिला एकत्र येऊन नागदेवतेची पूजा करतात आणि झिम्मा, फुगडी, झोका खेळत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. महिलांच्या याच उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी, फलटण नगरपरिषदेच्या वतीने नागपंचमीच्या पवित्र निमित्ताने शहरातील सर्व महिलांसाठी एका खास मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले की, फलटण नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी या सणाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता शनिनगर येथील नगरपरिषदेच्या बागेमध्ये या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपंचमीच्या निमित्ताने महिलांना दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांना एकत्र येऊन आनंद लुटता यावा आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपता यावी, या उद्देशाने नगरपरिषदेने या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी महिलांना विविध खेळांचा आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

तरी, फलटण शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नागपंचमीचा हा सण उत्साहात साजरा करावा, असे जाहीर आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव आणि फलटण नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!