शेतातील किडींवर नैसर्गिक नियंत्रण; सासकलमध्ये ‘पक्षी थांबे’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटण तालुक्यातील सासकल येथे कृषी विभागाच्या वतीने पिकांवरील नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी पक्षी थांबे तंत्रज्ञान आणि वृक्षलागवडीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. १६ ऑगस्ट : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम अंतर्गत सासकल (ता. फलटण) येथील बांदूळा वस्तीवर शेतकऱ्यांना वृक्षलागवड, पक्षी थांबे तंत्रज्ञान आणि निसर्गपूरक पीक उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नवनाथ खोमणे यांच्या बाजरीच्या शेतात हे पक्षी थांबे लावण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.

निसर्गपूरक कीड नियंत्रण

पिकांमध्ये पक्षी थांबे उभारल्यामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होते. यामुळे पिकांवरील अळ्या आणि विविध किडींचे नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण होण्यास मोठी मदत होते. कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कीड नियंत्रण करून उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

वृक्षलागवडीची चळवळ उभी करण्याचे आवाहन

या उपक्रमांतर्गत डोंगर शेतावर वडाच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध मोहिमांची माहिती दिली. ते म्हणाले, झाडे लावणे ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता गावागावांत वृक्षलागवडीची चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. झाडांमुळे भूजलपातळी टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे.

Back to top button
Don`t copy text!