दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२३ | फलटण |
आंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना या ठिकाणी ५०% आतील ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मागणी घेऊन सर्व गावतील तसेच पंचक्रोशीतील मराठा बांधव उपोषण आंदोलन करत होते; परंतु जालना येथे ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित केल्याच्या पार्श्वभूमीवर हे लोकशाही पद्धतीने सुरू असलेले उपोषण उधळून लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज, गोळीबाराचा फलटण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी निषेध केला आहे.
लाठीचार्ज, गोळीबाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज डेक्कन चौक, फलटण येथे सर्व मराठा बांधव जमले. तिथे राज्य सरकारचा निषेध नोंदवून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचा निषेध करण्यात आला. ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थित समन्वयकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामधून या सरकारला लोकशाही मार्गाने आरक्षण मागितले म्हणून गोळीबार, लाठीचार्ज करीत आहे, तब्बल ५८ मोर्चे शांततेत काढून काही उपयोग होत नाही, आता गुर्जर आंदोलनासारखे आंदोलन केले पाहिजे, असा सूर उमटला तर आता लोकशाही नाही तर ठोकशाहीकडे आपण वळले पाहिजे, असे अनेकांनी बोलून दाखविले. राज्यातील मराठा समन्वयक जे आदेश देतील, त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
दरम्यान, जालना येथील झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व समन्वयकांनी वरिष्ठ पातळीवर ज्या ज्या सूचना येतील, त्याप्रमाणे येणार्या काळात मराठा आरक्षण हे ओबीसीतून मिळविण्यासाठी आता मागे हटायचे नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.
यावेळी सर्व समन्वयक व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.