दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२३ । नागपूर । प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळावे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यानुसार आगामी वर्षभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात १० लाख घरे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये क्रेडाई, नागपूर मेट्रोच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पदग्रहण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., क्रेडाईचे अध्यक्ष गौरव अगरवाल, महासचिव एकलव्य वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात रेतीची तस्करी वाढली आहे. अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापुढे रेतीची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने काँक्रिट रस्त्यांसाठी चांगला निधी दिला. लवकरच प्रमुख रस्ते काँक्रिटचे असणारे नागपूर हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईप्रमाणे नागपूर ग्रामीणमधील गावांना जोडण्यात येईल.