हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांच्या कामाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २३: हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यासाठी उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड येथे बांधण्यात येत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या कामाची आज पर्यावरण आणि पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. नगरसेविका उर्मिला पांचाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, हायड्रॉलिक इंजिनियरिंग विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते.

हिंदमाता परिसर सखल भागात असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी ३ तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील. जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच हाय टाईडच्या कालावधीमध्ये याचा विशेष उपयोग होईल आणि त्यामुळे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी साचते अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करता येतील, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

या भूमिगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपिंग करुन त्या आच्छादित केल्या जातील. मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचते किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होते अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा आणखी संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.


Back to top button
Don`t copy text!