जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३० एप्रिल २०२३ । पुणे । जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा देऊन संकटातून बाहेर काढले, असे गौरवोद्गार काढून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना संकटात सेवा बजावताना जिल्ह्यातील ३८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाची दखल घेत त्यांचे जिल्हा परिषदेत येथे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

निष्ठापूर्वक करीत असलेल्या कार्याची दखल बक्षिसाच्या स्वरूपात घेतली जाते असे सांगत श्री. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू, अशीही ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!