हिंगणगाव गटात अ‍ॅड. किरणताई नलवडे यांच्या नेतृत्वाखाली ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीची’ टीम सज्ज

दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२६ | फलटण |
समाजाचा खरा विकास शाळा, शिक्षकांचे संस्कार, आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांतून होत असून शिक्षण हा माझ्यासाठी केवळ विषय नाही तर माझी सामाजिक बांधिलकी आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कार्य, नाविन्यपूर्ण अध्यापन, शाळेचा सर्वांगीण विकास करणार्‍या हिंगणगाव गटातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना प्रोत्साहन म्हणून “आदर्श शाळा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची ग्वाही जि. प. सदस्या अ‍ॅड. किरणताई नलवडे यांनी दिली.

सासवड येथे झालेल्या हिंगणगाव गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता समितीच्या बैठकीमध्ये समिती गठीत करण्यात आली. यामध्ये अ‍ॅड.किरणताई नलवडे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. तसेच समिती सदस्य म्हणून पंचायत समिती सदस्य सीमाताई भोईटे, संतोष कारंडे, दादासो कोळपे, सागर गोरे, पुष्पा पवार, प्रवीण झनझने, दत्ता खताळ व विस्तार अधिकारी संकपाळ व गटातील सर्व मुख्याध्यापक यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या यांनी त्यांचे शिक्षणाच्या बाबतीत असणारे व्हिजन सर्वांसमोर मांडले. यामध्ये येणार्‍या काळात गणित व सायन्स या विषयाची गोडी वाढण्यासाठी गटात ‘लॅब ऑन बाईक’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण समितीवर सदस्या असल्याने यंदा भव्य असे जिल्हास्तरीय ‘विज्ञान प्रदर्शन’ हिंगणगाव जिल्हा परिषद गटात आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या समितीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करणेसाठी वैयक्तिक १ लाख रुपये देणगी त्यांनी जाहीर केली आहे.

गटातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या तसेच विविध अडचणींचा आढावा घेऊन अ‍ॅड. किरणताई नलवडे म्हणाल्या, हिंगणगाव गटात शिक्षणाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आदर्श शाळा, प्रेरणादायी शिक्षक, यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षणातील नवीन बदल तसेच भौतिक विकास तसेच गुणवत्ता विकास कामासाठी दरवर्षी खर्च करण्यात येणार आहे. आपला गट शैक्षणिक गुणवतेचा आदर्श गट म्हणून ओळखला जाण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राजेंद्र काकडे, विक्रांत झनझने, विशाल झनझने, शुभम नलवडे, राजेंद्र पवार, संतोष खताळ, जयंत काकडे, सुनील पवार व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Back to top button
Don`t copy text!