शेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी (भाग-१)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । पुणे । शेळी मेंढी पालन व्यवसाय हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाकडून केला जात असला तरी या व्यवसायाकरिता लागणारे अल्प भांडवल, कमी मनुष्यबळ व कायम स्वरूपी उपलब्ध असलेली बाजारपेठ यामुळे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार, प्रगतीशील शेतकरी व व्यावसायिक या व्यवसायाकडे  आकर्षित होत आहेत.

राज्यातील पशुधनाच्या एकूण मांस उत्पादनापैकी शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाचा ३७.९४ टक्के वाटा आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या मासाला मोठ‌्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. तरूण सुशिक्षित रोजागारास उत्पन्न वाढीचा शाश्वत स्त्रोत निर्माण झाला आहे.

राज्यात शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देण्यासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे यात महत्वाचे योगदान आहे. या महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९७८ रोजी झाली. पशुसंवर्धन विभागाचे ९ मेष पैदास प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगिता केंद्र आणि १ शेळी मेंढी पैदास प्रक्षेत्र १ एप्रिल १९८४ पासून आणि १ शेळी प्रक्षेत्र जुलै २०१० पासून महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

महामंडळाच्या विविध १० जिल्ह्यात कार्यरत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रावर उस्मानाबादी शेळ्या तसेच डेक्कनी, माडग्याळ जातींच्या मेंढ्यांचे पैदाशिकरिता संगोपन करण्यात येत आहे. या प्रक्षेत्रामार्फत राज्यातील मेंढपाळ व शेळी पालकांसाठी विविध विकासात्मक कार्यक्रम तसेच शासकीय योजना राबविण्यात येतात.

सुधारित जातींचे मेंढेनर व बोकड यांच्या पैदाशीसाठी वाटप

महामंडळाच्या विविध प्रक्षेत्रावर डेक्कनी व संगमनेरी व माडग्याळ जातीच्या मेंढ्या तसेच उस्मानाबादी, बेरारी, संगमनेरी जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्यात येते, त्यापासून  उत्पादित होणारे जातिवंत बोकड व मेंढनर स्थानिक शेळ्यांची अनुवंशिकता गुणवत्ता सुधारण्याकरिता पैदाशीसाठी शेतकऱ्यांना उनलब्ध करून देण्यात येते.

मेंढी व शेळी पालन प्रशिक्षण

मेंढी व शेळी व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर तसेच मुख्यालय गोखलेनगर पुणे येथे उपलब्ध आहे. प्रशिक्षण कालावधी तीन दिवसाचा आहे. राज्यातीत शेळ्या व मेंढ्यांच्या जाती, शेळ्यांचा निवारा, आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, करडांची निगा, प्रक्षेत्रावरील दैनंदिन व्यवस्थापन, विमा, पैदास कार्यक्रमाचे नियोजन, पणन, शेळ्यांकरिता उपयुक्त चारा पिकांची लागवड, मुरघास तयार करण्याचे तंत्र याबाबत माहिती दिली जाते.

लोकर विणकाम आणि  लोकर कातरणी

ग्रामीण भागातील लोकर व्यवसायास चालना मिळावी तसेच स्वंरोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने महामंडळामार्फत लोकर विणकाम प्रशिक्षण दिले जाते. मेंढपाळ पारंपारिक पद्धतीने लोकर कातरणी करतात, त्यामुळे लोकरीच्या पाण्याचे बारीक तुकडे होऊन प्रतवारी कमी होते. त्यासाठी महामंडळामार्फत विजेवर चालणाचा यंत्राद्वारे मेंढ्यांची लोकर कातरणी रास्त दराने करून दिली जाते.

याशिवाय महामंडळ मेंढपाळामार्फत लोकर किफायतशीर भावाने खरेदी करून त्यापासून स्थानिक कारागिरांकडून लोकर वस्तू उत्पादन करून घेण्यात येते. महामंडळाच्या प्रक्षेत्रावर  शेळ्यामेंढ्यांकरिता उपयुक्त असलेले सुधारित जातींचे चारा बियाणे व संकरित गवतांचे थोंबे उत्पादित करून मेंढी पालकांना रास्त दरात उपलब्ध करून दिले जाते.

शेळी मेंढी पालन व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीना या व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात येते. महामंडळामार्फत शेळया मेंढयाच्या स्पर्धा, मेंढपाळांचे व लोकर वस्तूचे प्रदर्शन आयोजित केले जाते. महामंडळामार्फत बकरीईद निमित्त बोकड तसेच मेंढेनर उपलब्ध व्हावे तसेच रोजी-मेंढी पालकांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावे, यासाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

(क्रमश:)

– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे


Back to top button
Don`t copy text!