डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२९ जानेवारी २०२२ । मुंबई । छायाचित्रणाला एक चिकाटी आणि जिद्द लागते ती डॉ. दीपक सावंत यांच्यात असून त्यांच्या आजच्या या पुस्तकामुळे  त्यांच्यासमवेत केलेला जंगल भ्रमंतीचा अनुभव, ती दृष्ये जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी’आणि ‘उद्धव ठाकरे- द टायगर’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती.  कार्यक्रमास जेष्ठ छायाचित्रकार मोहन बने, प्रकाशक आनंद लिमये यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

आजवर अनेक प्रकाशने झाली, पण आजचा प्रकाशन कार्यक्रम वेगळा आहे, डॉ.दीपक सावंत यांना छायाचित्रकार, लेखक म्हणून एक वेगळी ओळख देणारा हा कार्यक्रम आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत केलेल्या अनेक जंगल भ्रमंतीचा आपला अनुभव यावेळी सांगितला. ज्या कान्हा जंगलापासून वाईल्ड फोटोग्राफीला आपण सुरुवात केली तिथे फिरत असताना वनरक्षकांच्या अडीअडचणी जाणवल्या, त्यातून आरोग्य शिबिराचे आयोजन, रुग्णवाहिकेची उपलब्धता, औषधांची उपलब्धता अशा अनेक बाबींच्या पूर्ततेत डॉ. सावंत यांनी केलेले कामही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  वनरक्षकांच्या अनेक अडचणी असतात, त्यांच्या आरोग्याचे, कुटुंबाचे आणि मुलांचे शिक्षणाचे प्रश्न  खूप वेगळे असतात हे या जंगल भ्रमंती दरम्यानच कळल्याचे ते म्हणाले. वन्यजीवांना आपण त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत, इथे वावरण्याची एक शिस्त असते असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. सावंत यांनी कमॅऱ्यानेच नाही तर लेखणीने जंगल टिपले असल्याचे या दोन पुस्तकांवरून दिसून येते.

पुस्तक प्रकाशनासाठी डॉ. सावंत यांचे अभिनंदन करून श्री. देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी  जंगल भ्रमंतीबरोबर गडकिल्ल्यांचे, वारीचे छायाचित्रण करताना जीव ओतून काम केल्याचे दिसते. यातून जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख निर्माण झाली. येथे मिळालेला संयम, अनुभव आणि शांत राहून ‘क्लिक’ करण्याची निर्णय क्षमता त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीत उपयोगी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना योग्य दिशा दिली, सगळ्या यंत्रणांना समवेत घेऊन काम केले. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक संघटनांनी घेतली.  त्यामुळे अशा व्यक्तीसमवेत छायाचित्रण करायला मिळणे, जंगलभ्रमंती करायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य डॉ. सावंतांना लाभले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगलभ्रमंतीचा आपला अनुभव या पुस्तकांच्या आणि छायाचित्रांच्या माध्यमातून सांगितला आहे.

आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ. दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगल भ्रमंतीचा आणि त्यांच्यासमवेत केलेल्या छायाचित्रण कलेचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, वन, जंगल वाचवण्यासाठीचा उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि काम यानिमित्ताने जवळून पाहता आले.. माझ्यासह सुरेश प्रभू, सुभाष देसाई, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत जंगलभ्रमंती केली आहे. त्यावेळी त्यांच्यातील माणूस आम्हा सर्वांनाच जवळून पाहावयास मिळाला. ते आपले या क्षेत्रातील गुरु आहेत. फोटोग्राफी करताना ते अतिशय बारीक गोष्टींची काळजी घेतात हे जाणवले.. पर्यावरणीय बदलाचे परिणाम थोपवण्यासाठी जंगले, वने वाचली पाहिजेत, असेही ते म्हणाले. डॉ. सावंत यांनी उद्योगमंत्र्यांसमवेत कोविड सेंटर, महारक्तदान शिबिरात काम करता आल्याचा आनंदही व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!