दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी नागठाणे (ता. सातारा) येथील ‘माळावरची यात्रा’ रद्द करण्यात आली असून श्रीराम रथोत्सव हा साधेपणात पार पडणार असल्याची माहिती नागठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ.रुपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली आहे. यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व बोरगाव पोलिस यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागठाणेची माळावरची यात्रा ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या निमित्ताने दहा दिवस येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. तसेच गावचे आराध्यदैवत प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य रथयात्रा येथे निघते. यावर्षी २ फेब्रुवारीला हा रथोत्सव होणार आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही मोठ्या स्वरूपात भरणाऱ्या यात्रा, जत्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
याच अनुषंगाने बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजित यादव यांनी ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्ट यांची नुकतीच बैठक बोलावली होती.या बैठकीस सरपंच डॉ.रुपाली बेंद्रे,उपसरपंच अनिल साळुंखे,देवस्थान ट्रस्टचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य हजर होते.यावेळी सपोनि अभिजित यादव यांनी यावर्षीही जिल्ह्यात कोरोना साथरोगाचा आणि नवीन व्हेरिअंटचा प्रादुर्भाव असल्याची माहिती देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधाची माहिती दिली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत या वर्षी भरणारी माळावरची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेत प्रभू श्री रामचंद्रांचा रथोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. केवळ रथोत्सवादिवशी गावातील अजिंक्य चौकात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, ग्रामपंचायत सदस्य व मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथ पूजन करण्यात येऊन जागेवरच रथ उभा करण्यात येणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.