अवैध गर्भपातप्रकरणी जामिनावर असलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या बेकायदा हॉस्पिटलवर धाड


स्थैर्य, बीड,दि.७: शनिवारी रात्री दहा वाजेची वेळ.. परळीच्या रामनगर परिसरात अचानक शंभर पोलिसांचा फौजफाटा दाखल होतो.. काही क्षणात ‘मुंडे हॉस्पिटल’ वेढले जाते.. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरातांसह १० अधिकारी रुग्णालयात प्रवेश करतात.. तब्बल ८ तास झाडाझडती होते. अवैध गर्भपात प्रकरणातील जामिनावर सुटलेला आरोपी डॉ. सुदाम मुंडे याच्या बेकायदा रुग्णालयाचा शनिवारी रात्री भंडाफोड झाला. या धडक कारवाईवेळी खुद्द जिल्हाधिकारी राहुल रेखावार मध्यरात्रीपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात ठाण मांडून बसलेले होते. अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटातील प्रसंग शोभेल अशा घडामोडी शनिवारी रात्री परळीत डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावरील छाप्यादरम्यान घडल्या.

राज्यभर गाजलेल्या परळीच्या गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात प्रकरणाने डाॅ. सुदाम मुंडे याला या प्रकरणात बीडच्या सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडेचा वैद्यकीय व्यवसाय परवाना ऑक्टोबर २०१५ मध्येच रद्द केला आहे. फेब्रुवारीत सर्वाेच्च न्यायालयाने त्याला जामीन दिल्यानंतर ताे वर्षभरापासून परळीत आहे. परळी शहराजवळ असलेल्या रामनगरमधील शेतातील बंगल्यात त्याने विनापरवाना पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता. या ठिकाणी तो कोरोनासदृश रुग्णांवर उपचार करत होता. शिवाय अवैध गर्भपाताचा जुनाच धंदा पुन्हा त्याने सुरू केल्याची शंका आणि माहिती प्रशासनाकडे आली होती. अनेक दिवसांपासून प्रशासन मुंडेच्या रुग्णालयावर लक्ष ठेवून होते.

काय आहे प्रकरण

> १९ सप्टेंबर २०१० – ‘लेक लाडकी’ अभियानाकडून गर्भलिंग निदानाचे स्टिंग. गुन्हा नोंद

> १६ मे २०१२ – रुग्णालयात आलेल्या विजयमाला पटेकर या महिलेला जळगावला पाठवले.

> १७ मे २०१२ – जळगावात डॉ. राहुल कोल्हेंकडून गर्भलिंग निदान, मुलगी असल्याचे स्पष्ट.

> १८ मे २०१२ – परळीत डॉ. मुंडेच्या रुग्णालयात गर्भपातादरम्यान विजयमाला यांचा मृत्यू.

> १९ मे २०१२ – डॉ. मुंडे दांपत्याविरोधात गुन्हा नोंद, तीन दिवसांनंतर दांपत्य फरार.

> १७ जून २०१२ – विविध राज्यांत फिरून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया करताच मुंडे दांपत्य शरण.

> १५ जून २०१५ – अंबाजोगाई न्यायालयाकडून ४ वर्षे शिक्षा, ८० हजारांचा दंड.

> ऑक्टोबर २०१५ – डॉ. मुंडेचा वैद्यकीय व्यवसाय परवाना ऑक्टोबर २०२० पर्यंत रद्द.

> ८ फेब्रुवारी २०१९ – डॉ. मुंडे दांपत्यासह महादेव पटेकरला १० वर्षे शिक्षा, ५० हजार दंड.

या पथकाने केली छापेमारी :

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दिनेश कुरमे, तहसीलदार विपिन पाटील, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार, धर्मापुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब मेढे, औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे

कोरोनासदृश रुग्णांवर उपचार : छापा मारला तेव्हा सुदाम मुंडे याच्या रुग्णालयात चार काेराेनासदृश रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील दोन रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर होते. दोघेही संशयित रुग्ण आहेत. या दोन्ही रुग्णांना आता अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले.

बैठकीचे निमित्त अन् सर्जिकल स्ट्राइक

शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने परळीत अाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात सकाळपासूनच तळ ठोकून होते. रात्री साडेआठपर्यंत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर रात्री दहा वाजता आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि पोलिस यांच्या १०० जणांच्या पथकाने मुंडेच्या रुग्णालयावर छापा टाकला. ही धडक कारवाई ८ तास चालली.

कारवाईपूर्वी सर्वांचे मोबाइल घेतले

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या छाप्याचे नियोजन केले होते. छाप्याचे नेतृत्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले. मोजक्याच अधिकाऱ्यांना याची माहिती होती. सुरुवातीला सगळ्यांचे मोबाइल ताब्यात घेतले गेले. त्यानंतर सर्वांना वाहनात बसवले गेले व नंतर छाप्याबाबत माहिती दिली गेली. जिल्हाधिकारी या कारवाईवर उपजिल्हा रुग्णालयातून देखरेख करत होते.

डॉ. मुंडेचा थयथयाट; अधिकाऱ्यांचे थोबाड फोडण्याची भाषा :

रुग्णालयावर छापा टाकताच डॉ. सुदाम मुंडे याने थयथयाट केला. तुम्ही माझ्या रुग्णालयात कसे आलात? असे विचारून मुंडेने अधिकाऱ्यांना थोबाड फोडण्याची धमकी दिली.

गर्भपाताचे साहित्य जप्त

छाप्यात गर्भपातासाठी आवश्यक असलेली उपकरणे, दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन, दोन नेब्युलायझर, पोर्टेबल एक्स-रे मशीन, ईसीजी मशीन, लाखो रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे.

दहा कलमान्वये गुन्हा नोंद :

नापरवाना वैद्यकीय व्यवसाय, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंध कायदा, वैद्यकीय गर्भपात प्रतिबंध कायदा, प्रदूषण नियंत्रण, मुंबई शुश्रूषा नोंदणी कायदा, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, रुग्णांची फसवणूक या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!