महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! दहिवडीत ८० वर्षांपूर्वी घुमलेली डॉ. बाबासाहेबांची डरकाळी; वाचा ऐतिहासिक सभेचा धगधगता इतिहास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख: १५ फेब्रुवारी १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहिवडी (ता. माण) येथे घेतलेल्या ऐतिहासिक सभेचा आणि त्यांच्या प्रखर राजकीय भूमिकेचा वेध घेणारा धगधगता इतिहास. (लेखक: सोमनाथ घोरपडे).

स्थैर्य, दहिवडी, दि. 14 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांना विनम्र अभिवादन करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अमोघ वाणीने आणि प्रखर विचारांनी संपूर्ण देशाला जागृत केले. अशाच एका धगधगत्या विचारांची ठिणगी आजपासून बरोबर ८० वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ‘दहिवडी’ येथे पडली होती.

१५ फेब्रुवारी १९४६ रोजी कायदेमंडळाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. बाबासाहेबांनी दहिवडीत एक ऐतिहासिक आणि अत्यंत स्फोटक सभा घेतली होती. दिल्लीहून तब्बल एक हजार मैलांचा प्रवास करून त्यांनी माण-खटावच्या जनतेला जे विचार दिले, ते आज आठ दशकांनंतरही तितकेच प्रासंगिक आणि अंगावर शहारे आणणारे आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ घोरपडे यांनी संकलित केलेल्या या माहितीच्या आधारे, महामानवाच्या जयंतीनिमित्त या सभेतील त्यांच्या धगधगत्या विचारांना दिलेला हा उजाळा!

“माझा व गांधींचा झगडा वैयक्तिक नाही, तर समाजाच्या भवितव्याचा!”

या ऐतिहासिक सभेत बाबासाहेबांनी अत्यंत परखड शब्दांत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, “सध्या वर्तमानपत्रांमध्ये गांधी आणि माझ्या झगड्याला ऊत आला आहे. गांधींचा टिळकांशी, गोखलेंशी झगडा होता, जो आता नामशेष झाला. पण माझा झगडा १९२० पासून तसाच चालू आहे. याचे कारण मला गांधींकडे स्वतःसाठी काहीही मागायचे नाही. मी माझ्या बुद्धीने आणि कर्तृत्वाने जीवन जगत आहे. माझा गांधींशी चाललेला झगडा हा वैयक्तिक नसून, तो या दबलेल्या समाजाच्या वतीने आणि त्यांच्या भवितव्यासाठी आहे.”

स्वातंत्र्याच्या लढ्यावर भाष्य करताना बाबासाहेबांनी एका अत्यंत ज्वलंत वास्तवावर बोट ठेवले होते. “सगळे स्वराज्य मागत आहेत, पण ते स्वराज्य कोणाचे? जर त्या स्वराज्यात आम्हाला आमचे न्याय्य हक्क आणि अधिकाराच्या जागा मिळणार नसतील, तर असे हिंदूंचे स्वराज्य म्हणजे आमच्यासाठी ‘शुद्ध पेशवाई’ ठरेल,” असा घणाघात त्यांनी केला होता. पेशवाईत अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला खराटा बांधल्याचा दाखला देत, ती भयंकर परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणूनच हा लढा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.

परावलंबनावर प्रहार आणि जागृतीचा इशारा

दहिवडीच्या याच सभेत बाबासाहेबांनी शेजारील एका संस्थानाचे अत्यंत बोलके आणि डोळे उघडणारे उदाहरण दिले होते. तेथील काही महार समाजाच्या लोकांकडे पूर्वी ४ चाहूर जमीन होती. मात्र, तत्कालीन प्रशासनाने दररोज ५०० कुटुंबांना पंचपक्वान्न देण्यास सुरुवात केली होती. उरलेले अन्न दररोज मिळत असल्याने तो समाज शेती करण्याकडे दुर्लक्ष करू लागला आणि उष्ट्या अन्नावर जगू लागला.

परिणामी, जमिनीवर जंगल उगवले आणि त्या जमिनी इतर लोकांनी ताब्यात घेतल्या. पुढे ६०-७० वर्षांनी प्रशासनाने ते जेवण बंद केले, तेव्हा जमिनी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. “परावलंबी जीवनामुळे हक्क कसे जातात, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे आता झोप सोडून जागे व्हा,” असा खणखणीत इशारा बाबासाहेबांनी दिला होता.

“मत म्हणजे ईश्वराने दिलेला संजीवनी मंत्र”

डॉ. बाबासाहेबांनी या निवडणुकीला ‘कौरव-पांडवांचा संग्राम’ संबोधले होते. त्यांनी जनतेला स्पष्ट बजावले होते की, “काँग्रेसचे तिकीट म्हणजे धन्याने कुत्र्याला दुसरीकडे जाऊ नये म्हणून गळ्यात घातलेला पितळेचा पट्टा आहे. जो काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे तो स्पृश्यांचा गुलाम आहे, त्याला पाडणेच गरजेचे आहे.” तसेच, मताचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले होते की, “मत म्हणजे ईश्वराने दिलेला संजीवनी मंत्र आहे. पैशांना भुलून राजकारण करू नका. राजकारणात आपला प्रतिनिधी कायदेमंडळात गेला तरच ज्या जात्याखाली आपण भरडले जात आहोत, त्या जात्याचा खुंटा आपल्या हातात येईल.”

दहिवडीत झालेल्या या सभेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक जागृतीची एक मोठी लाट निर्माण केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या दूरदृष्टीला आणि प्रखर वैचारिक लढ्याला ‘स्थैर्य’ परिवाराकडून विनम्र अभिवादन!

Back to top button
Don`t copy text!