
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. 30, (रणजित लेंभे) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदी मुळे सर्व व्यवहार बंद झाले आहेत. ही परिस्थिती विचारात घेऊन शनैश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्यामार्फत गरजूंना जीवनावश्यक वस्तूं वाटप करण्यात आले.
सध्याची कोरोना संसर्ग परिस्थितीत विचारात घेता परिसरातील बहुतांशी कुटुंबियांपुढे संकट उभे राहिले आहे.यासाठी श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प.पू.नंदगिरी महाराज व मार्तंड देवस्थान यांच्यामार्फत उत्तर कोरेगाव परिसरातील दहा गावातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले त्याचबरोबर लोकांना भाजी व इतर आवश्यक वस्तू खरेदीसाठी काही रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली. परिसरातील गावातील प्रमुख व्यक्तीकडे त्या गावातील गरजूंसाठीच्या वस्तूंचे कीट देण्यात आले. यामध्ये तेल, डाळ, तांदूळ, चटणी व इतर तत्सम वस्तूंचा समावेश आहे.
दरम्यान यावेळी शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प. पू. नंदगिरी महाराज, मार्तंड देवस्थान ट्रस्टचे लोढा, डॉ.अशोक कदम, प्रमोद सोळस्कर, पिंपोडे बुद्रुकचे ग्रामपंचायत सरपंच नैनेश कांबळे, रणदुल्लाबादचे सरपंच अॅड. मंगेश जगताप, भूषण पवार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.