अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोष : मार्क झुकरबर्ग


 

स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.३१: अमेरिकेत निवडणुकीच्या निकालापूर्वी फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी गंभीर इशारा दिलाय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या काळात अमेरिकन नागरिकांकडून असंतोष व्यक्त केला जाऊ शकतो, अशी शंका झुकरबर्ग यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही निवडणूक फेसबुकसाठी देखील एक परीक्षा असल्याचं म्हटलं आहे.

झुकरबर्ग म्हणाले, ‘आपला देश विभागलेला दिसत आहे याची मला काळजी वाटते. जर निवडणुकीला काही दिवसांचा अथवा आठवड्याचा उशीर झाला तर नागरिकांमधून असंतोष व्यक्त होऊ शकतो. पुढील आठवडा फेसबुकसाठी अग्निपरीक्षा घेणारा असणार आहे. आतापर्यंत फेसबुकने केलेल्या कामावर आम्हाला अभिमान आहे. 3 नोव्हेंबरनंतरही आमचं काम सुरुच राहिल.’

दरम्यान, फेसबुकवर अमेरिकेसह अन्य देशांच्या मागील निवडणुकांवर प्रभाव टाकत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप झालेला आहे. याच काळात केंब्रिज अनालिटिका प्रकरणात फेसबुकच्या वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर झाल्याचाही आरोप झाला. त्यामुळे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यामुळे यावेळी फेसबुकने असं होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारतात देखील नुकतीच संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान समितीने फेसबुक इंडियाच्या अधिका-यांची कसून चौकशी केली आहे. यानंतर फेसबुक इंडियाच्या पॉलिसी प्रमुख यांना आपला राजीनामा द्यावा लागला.

याआधी देखील अमेरिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडू शकतात अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकन नागरिकांना देखील निवडणूक निकालानंतर हिंसाचार भडकण्याची भीती आहे. यावर एफबीआय आणि एनएसए सारख्या सुरक्षा संस्थांनी एक अहवाल देखील दिला आहे. यानंतर अमेरिकेची काळजी वाढली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!