दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सांगवी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले.
कृषीकन्या तनुजा शिंगाडे, अनुजा भिसे, पूजा चौधर, प्रणिता अगवणे, अंकिता कुंभारकर, ऋतुजा भामे यांनी दुधावर प्रक्रिया करून त्यापासून ‘पेढा’ हा पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक महिलांसमोर सादर केले. त्याअंतर्गत त्यांनी पेढा तयार करण्याची शास्त्रीय पद्धत सविस्तररित्या सांगितली व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
तसेच त्यांनी पेढ्याचे विविध प्रकार जसे की, मलई पेढा, खव्याचा पेढा, कोरडा पेढा, साखरी पेढा इ.ची स्पष्ट माहिती दिली. पेढा बनवण्याच्या घरगुती पद्धतीव्यतिरिक्त नवीन आधुनिक यंत्र वापरून पेढा तयार करण्याची पद्धत याचीही ओळख महिलांना करून दिली. दुग्धप्रक्रियेचा लघुउद्योग सुरू करण्याची कल्पनाही महिलांना दिली. या उपक्रमास महिलांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. अश्विनी नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.