रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी : सोशल मीडियावर रतन टाटा यांनी लिहिले – ‘तुमच्या भावनांविषयी आदर आहे, पण कृपया ही मोहीम बंद करा’


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.७: टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यासाठी सोशल मीडियावर #BharatRatnaForRatanTata कॅम्पेन चालवले जात आहे. आता स्वतः टाटा यांनी सोशल मीडियावर याविषयावर भाष्य करत ही मोहीम बंद करण्याची विनंती केली आहे.

रतन टाटा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले, ‘सोशल मीडियावरील लोकांच्या एका गटाकडून मला पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. मी तुमच्या भावनाचा आदर करतो, मात्र माझी नम्र विनंती आहे की, ही मोहीम बंद करण्यात यावी. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, मी भारतीय आहे आणि भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न व योगदान देत आहे’

मोटिव्हेशनल स्पीकरने सुरू केली होती मागणी
मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. बिंद्रा यांनी लिहिले, ‘रतन टाटा यांचा असा विश्वास आहे की आजचे उद्योजक भारताला पुढच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात. त्यांना भारतरत्न देण्याची आमची मागणी आहे. आमच्या मोहिमेत सामील व्हा आणि शक्य तितक्या हे पोस्ट शेअर करा.’ यानंतर ट्विटरवर #RatanTata आणि #BharatRatnaForRatanTata टॉप ट्रेंडमध्ये आले.’

सोशल मीडिया यूजर्सने टाटा यांच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या सोशल मीडियावर यूजर्स सतत रतन टाटा यांच्या चांगल्या कामांच्या पोस्ट शेअर करत आहेत. लोक म्हणत आहेत की, टाटा यांनी प्रत्येक कठीण काळात देशाला साथ दिली आहे आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!