‘दैनिक स्थैर्य’च्या बातमीचा दणका: गिरवी-बोडकेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात


स्थैर्य, गिरवी, दि. ४ जून : फलटण तालुक्यातील गिरवी ते बोडकेवाडी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबतची वस्तुस्थिती मांडणारी बातमी ‘दैनिक स्थैर्य’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. या बातमीचा मोठा दणका बांधकाम विभागाला बसला असून, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परिणामी, गेल्या चार दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले आहे.

पॅचवर्क सुरू, पण बांधांचे नुकसान झाल्याने शेतकरी नाराज

रस्ता दुरुस्तीच्या कामांतर्गत जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेची साफसफाई करण्यात आली. मात्र, जेसीबी चालकाने केलेल्या हलगर्जीपणामुळे रस्त्यालगतच्या काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या रस्त्यावर डांबरी पॅचवर्कचे काम वेगाने सुरू असून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे.

‘स्थैर्य’च्या लोककल्याणकारी पत्रकारितेचे कौतुक

बोडकेवाडी परिसरातील नागरिकांनी ‘दैनिक स्थैर्य’च्या बातमीचा हा सकारात्मक परिणाम पाहून समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील या डोंगराळ भागातील नागरिकांच्या दळणवळणाची झालेली दुरवस्था ‘स्थैर्य’ने चव्हाट्यावर आणली. लोकांच्या हिताची जपणूक करणारी वास्तववादी बातमी प्रसिद्ध करून ‘दैनिक स्थैर्य’ने लोककल्याणकारी पत्रकारिता जपल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी व नागरिकांनी ‘स्थैर्य’चे विशेष आभार मानले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

सध्या प्रशासनाकडून केवळ खड्डे बुजवून डांबरी पॅचवर्क केले जात आहे. मात्र, गिरवी ते बोडकेवाडी या संपूर्ण रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण आणि नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लवकरच बोडकेवाडी परिसरातील नागरिक व ग्रामस्थांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी ‘दैनिक स्थैर्य’शी बोलताना दिली.


Back to top button
Don`t copy text!