
स्थैर्य, औंध, दि. 29 : खटाव तालुक्यात सध्या आले या नगदी पिकाच्या लागवडीची धांदल सुरू असून अंदाजे 2500 हेक्टर क्षेत्रावर आल्याची लागवड करण्यात आली आहे. नव्या पिढीतील तरुण शेतकऱ्यांचा आले या नगदी पिकाच्या लागवडीकडे कल वाढला आहे. खटाव तालुक्यातील पुसेगाव, पुसेसावळी, औंध परीसरात मोठ्या प्रमाणावर आल्याची लागवड करण्यात येते. आले हे नगदी पीक असून दरातील चढउतार होत असला तरी चांगल्या पद्धतीने पिक घेतले तर हमखास चार पैसे मिळून जातात. त्यामुळे पाण्याची खात्री असल्यास शेतकरी आले पिक घेण्यासाठी पसंती देत आहेत. शिवाय पाण्याची बचत होण्यासाठी ठिबकसिंचन, तुषारसिंचन पध्दतीचा वापर केला जात आहे. यामुळे पिकाला थेट पाणी आणि खते देऊन उत्पन्न चांगले घेता येते. तसेच आंतरपीक म्हणून मिरची, वेलवर्गीय पिके, पपई, मका आदी पिके घेता येतात. हमखास चार पैसे मिळत असल्याने तरुण शेतकरी आले पिक घेण्यासाठी पुढे येत आहेत.
वास्तविक दरवर्षी आल्याची लागवड अक्षयत्रुतीयाच्या मुहूर्तावर केली जाते. परंतु दिवसेंदिवस तापमानात वाढ होते आहे. एप्रिल महिन्यात लागवड केली तर जमीनीचे तापमान जास्त आणि पाण्याची ओढ बसली तर उष्णतेमुळे आले गाभाळून जाते त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असल्याने अलीकडे शेतकरी मान्सून पूर्व पाऊस झाल्यावर जमीनीचा ओलावा वाढून तापमान कमी झाल्यानंतरच लागवड करण्यावर भर देतात. मे महिन्यात वळीवाचे समाधान कारक पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी लागवडीची पूर्व तयारी केली आहे.आले लागवडीसाठी सध्या वातावरण पोषक असल्याने लागवडीसाठी लोकांची धांदल सुरू झाली आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव,नेर, ललगूण, काटकरवाडी, खातगूण, फडतरवाडी, विसापूर, जांब, जाखणगाव, गादेवाडी, बिटलेवाडी, औंध, येळीव, पळशी, पुसेसावळी, वडी कळंबी, लाडेगांव, वांझोळी, उंचिठाणे, चोराडे, वडगांव, रहाटणी, गोरेगाव, आदी गावात आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते अंदाजे यंदा अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आल्याची लागवड करण्यात आली आहे. आले लागवडीसाठी एक एकरासाठी बियाणे, खते, औषधे, ठिबक, रोजगारी असा मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. सध्या बियाणाचे दर तेवीस ते पंचवीस हजार रुपये गाडी असा आहे.
तालुक्यात ‘सातारी ‘ जातीला बाजारात मागणीसुप्रभा, सातारी, औरंगाबादी, छत्तीसगड, उत्तरांचल आदी आल्याच्या जाती आहेत. आपल्याकडे सातारी आणि औरंगाबादी जातीची लागवड केली जाते. सातारी आले चवीला तिखट आणि त्याच्यात विशिष्ट गुणधर्म असल्याने बाजारपेठेत सातारी आल्याला चागला दर मिळतो. तर सातारी आणि औरंगाबादी या दोन जातीवर प्रक्रिया करून सुप्रभा ही नवीन जात विकसित केली आहे.