
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । मुंबई । चीन आणि जपानसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ती बाब विचारात घेऊन भारत सरकारने संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. देशात कोरोनाबाबत सतर्कता वेगाने वाढत आहे. रुग्णालयामध्ये योग्य व्यवस्था ठेवण्यासाठीच्या सूचना आधीच दिल्या गेल्या आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स लागू करण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्र्यालयाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ७२ तास आधीच्या आरटीपीसीआर चाचणीची कागदपत्र अपलोड करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ही व्यवस्था Transiting प्रवाशांसाठीही अनिवार्य करण्यात आली आहे. देशात आल्यानंतरही तपासणी केली जाईल, असे म्हटले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव झालेल्या देशांचा प्रवास करून भारतात आलेल्या प्रवाशांसाठी ७२ तास आधीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट अपलोड करणे आवश्यक असेल. तसेच सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरणेही आवश्यक असेल.
दरम्यान, नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. एम. वली यांनी रविवारी सांगितले की, XBB.1.5 चा नवा व्हेरिएंट भारतामध्ये विषाणूजन्य नाही आहे. कारण ९० टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालेलं आहे. तसेच ३० ते ४० टक्के लोकांनी बुस्टर डोसही घेतला आहे.