
स्थैर्य, सातारा, दि. १९ : राजकारण, प्रशासन, प्रस्थापित व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे सर्व बाजूला सारून प्रत्येक सामान्य माणसाने स्वत:च्या मर्यादेत राहून काम केले तरी कोरोनाच्या साथीवर मात करून निरोगी दीर्घायुष्याच्या वाटेवर सुखाने मार्गक्रमण करता येऊ शकते. त्याविषयी…
सद्यस्थितीत संपूर्ण जगात दिसणारे महामारीचे विदारक चित्र. यापूर्वीही आपला देश किंवा इतरही अनेक देशांना भोगावी लागलेली नैसर्गिक आपत्ती त्यामध्ये वादळ, ढगफुटी, चक्रीवादळ, रेतीचे वादळ, अतिवृष्टी,पूर, दुष्काळ, भूकंप, त्सुनामी किंवा मोठ्या प्रमाणात होणारे साथीचे रोग अशा अनेक घटनांचा समावेश होऊ शकतो. या घटनांमुळे त्या, त्या देशात किंवा त्या, त्या भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्त- हानी, अन्नधान्य, पशुधनाची हानी, सामाजिक व्यवस्थेची हानी इतक्या मोठ्या प्रमाणावर होते, की त्यातून सावरण्यासाठी केवळ मनुष्याचाच विचार केला तर त्यानेच स्वसंरक्षणाकरिता निर्माण केलेल्या व्यवस्था तोकड्या पडतात. निसर्ग आणि पर्यावरण परिस्थिती सुधारण्याचा विचार तर लांबच राहिला. बरं त्यात एखाद्या भागात अशी विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली असेल तर दुसर्या सुरक्षित भागातून तेथे मदत होऊ शकते., परंतु संपूर्ण पृथ्वीतलावरच अशी विध्वंसक परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र कुणी कुणाचे नाही, राजा कुणी कुणाचे नाही याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. मोठ्या प्रमाणात प्रसार झालेल्या व्याधीची व्याप्ती इतकी प्रचंड असते, की त्यापुढे वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर, परिचारक, सहाय्यक आणि साक्षात औषधंही काही वेळा निष्फळ ठरतात किंवा त्यांची व्यवस्था आणि पुरवठा अपुरा पडतो आणि त्यातूनच पुढे महामारीसारखे संकट उद्भवते. अशा आपत्तीचे संक्रमण होत असताना कोणतीही जात-पात, धर्म, वय, लिंग, श्रीमंत-गरीब, राजा-रंक कशाकशाचाही मुलाहिजा राखला जात नाही. सरसकट सर्वांनाच अशा आपत्तीची झळ सोसावीच लागते. सर्वांनाच कठोर अग्निपरीक्षेला सामोरे जावेच लागते. या सर्व परिस्थितीचा ऊहापोह अथर्ववेदाचे उपांग असलेल्या आयुर्वेद शास्त्रात इ. पू. 5000 वर्षे इतक्या पूर्वीच्या काळात जनपदोध्वंसनीय अशा स्वतंत्र अध्यायात किंवा प्रकरणात केला आहे. अत्याधुनिक साधने, प्रयोगशाळा, तंत्रज्ञान, वैज्ञानिक परिभाषा अशी कोणतीही उपलब्धी नसताना सुद्धा भविष्यात अशी संहारक परिस्थिती येऊ शकते असे अनुमान करणे आणि शास्त्रशुद्धपणे त्याची कारणे, लक्षणे वर्णन करणे आणि अशी परिस्थिती मुळात येवूच नये आणि आलीच तर त्यातून सुखरूप बाहेर कसे पडणे या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे सांगणे हे खरोखरच सध्याच्या व्यवस्थेला अगम्य आहे. संस्कृत श्लोकात संक्षिप्त स्वरूपात त्या काळाला अनुसरून त्याची मांडणी असली तरी त्यातील दूरदृष्टी आणि व्याप्ती महनीय आहे. आज कोरोनाच्या निमित्ताने आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या सर्व परिस्थिती संदर्भात केलेले चिंतन या स्वरूपात हा लेखन प्रपंच.
मुळात प्रश्न असा पडतो, की देवाने अथवा अलौकिक शक्तीने इतकी सुंदर सृष्टी, चराचराची निर्मिती केली आहे आणि मग याच निर्मितीचा असा
संहार होण्यामागची कारणे काय असावीत? यामध्ये दोष कोणाचा? यावर उपाय काय? धर्म म्हणजे काय? याचे उत्तर आयुर्वेद शास्त्रात अतिशय शास्त्रशुद्ध, परंतु अगदी सोप्या शब्दात दिले आहे की अशा संहारक परिस्थितीचे कारण केवळ अधर्माचरण एवढेच आहे. कदाचित सुरुवातीला आपल्याला हे पटणार नाही, हास्यास्पद किंवा कर्मठ वाटण्याची शक्यता आहे. परंतु आयुर्वेदानुसार धर्म या शब्दाचा अर्थ आपणास जर नीट समजला तर आपले डोळे निश्चित उघडतील. धर्म म्हणजे केवळ हिंदू-मुस्लिम-शीख इतका वरवरचा उथळ अर्थ येथे अपेक्षित नाही, की जो आज सर्वसामान्य जनमानसात रुजलेला दिसतो. धर्म ही त्याही पलीकडची विस्तृत संकल्पना आहे. धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती किंवा नैसर्गिक स्वभाव किवा निसर्गनियम असे म्हटले तरी चालेल. याची अगदी सोपी उदाहरणे म्हणजे नदीचे पाणी तिच्या नियत मार्गातून वाहते. सूर्यामुळे उष्णता तर चंद्रामुळे शितलता मिळते, हवा अस्थिर आहे, मासा पाण्यात राहतो, गाय गवत खाते तर उलटपक्षी वाघ गवत खात नाही. मनुष्य स्वभावधर्माचा विचार केला तर कितीही नालायक मुलगा असला तरी त्याच्या आईचे त्याच्यावर प्रेम असतेच, हा मातृधर्म किंवा आईच्या अंगी असलेला सहजधर्मच म्हणावा लागेल. याचप्रमाणे राजधर्म, पितृधर्म, मित्रधर्म, शिष्यधर्म यांचीही उदाहरणे घेता येतील, की ज्यात ती ती जबाबदारी पार पाडत असतानाची अपेक्षित कर्तव्ये आणि त्याला अनुसरूनची आदर्श आचारसंहिता यांचा आपल्याला बोध होतो. धारणात धर्मः। अशीही एक व्याख्या सांगितली आहे किंवा धर्मो धारयति प्रजा:। असेही म्हटले जाते. या ठिकाणी प्रजेचे किंवा समाजाचे धारण करणारा तो धर्म असा अर्थ होतो. म्हणजेच ज्या सहज गुणांमुळे समाजाची लौकिक आणि पारमार्थिक उन्नती होऊन त्याचे जीवन सुकर होते आणि तो मोक्षपदी पावतो, अशा नीतिनियमांना धर्म असे म्हटले आहे.
सूर्याच्या उष्णतेने नद्या, समुद्र यातील पाण्याची वाफ होते. ती वर जाते. त्यातून ढग तयार होतात. वार्याने ते नियत दिशेने योग्य त्या स्थळापर्यंत प्रवास करतात आणि मग पाऊस पडतो. पावसाचे पाणी पुन्हा नदी व समुद्राला जाऊन मिळते. हे निसर्गचक्र आपण लहानपणी शिकलो आहे तसेच एखाद्या घनदाट जंगलात आपण गेलो तर माशा, किडे, फुलपाखरे, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि हिंस्त्र श्वापदे आणि वृक्षसंपदा या सर्वांचेही एकमेकांशी एकप्रकारचे संतुलनात्मक नाते असते. या सर्व जिवांची एक साखळी किंवा जीवनचक्र तेथे सुरू असते. ज्यावेळी अशा चक्राच्या गतीमध्ये कोणत्याही कारणाने बाधा येते आणि ती कमी- जास्त होते त्यावेळी काही तरी अनर्थ घडतो आणि विपरीत परिस्थिती निर्माण होते.
धर्माची व्याप्ती खूपच मोठी आहे आणि ती संकल्पना एकदा का नीट समजली, की अधर्म आपोआपच समजतो आणि तो तसंही आपल्या नित्य परिचयाचाही आहे. पशू-पक्षी, जनावरे ही तर निसर्गाचाच भाग आहेत. त्यांचा जीवनक्रम हा देखील निसर्गनियमांना अनुसरूनच सुरू असतो. मानवाच्या बाबतीत मात्र त्याची बुद्धी हा त्याचा विशेष गुणचं त्याच्या विनाशाचे कारण ठरतो. आयुर्वेद शास्त्राने सर्व रोगांचे मूळ कारणचं हे प्रज्ञापराध असे सांगितले आहे. अर्थात आयुर्वेद हे आरोग्यशास्त्र असल्याने रोगाचे कारण असा उल्लेख आहे. खरं तर सर्वच दुरवस्थेचे कारण म्हणूनही प्रज्ञापराधाकडे बघितले पाहिजे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि तिने केलेला अपराध किंवा गुन्हा म्हणजे प्रज्ञापराध होय. एखादी गोष्ट आपल्या स्वतःकरिता किंवा समाजाकरितासुद्धा अहितकर आहे हे माहिती असून देखील ती करणे म्हणजेच प्रज्ञापराध होय. सारासार विचार न करणे, सद्सद्विवेकबुद्धी जागृत नसणे, योग्य विचार केला असला तरी तो प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे धैर्य न दाखवणे, पूर्वी झालेल्या दुष्परिणामांची विस्मृती होणे किंवा आठवण झाली, तरी तात्कालीक सुखासाठी त्याकडे दुर्लक्ष करणे ही सर्व प्रज्ञापराधाचीच लक्षणे आहेत. थोडक्यात कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती म्हणजे प्रज्ञापराध होय.
अति सर्वत्र वर्जयेत असं एक सूत्र आपल्या नेहमीच्या ऐकण्यात असते. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात सातत्याने करणे, अजिबात न करणे, चुकीच्या किंवा विकृत स्वरूपात करणे ही सुद्धा रोगावस्थेची कारणे म्हटली आहेत. व्यवहारातीलच उदाहरण घ्यायचे झाले तर आवश्यकता नसताना सुद्धा वरचेवर उगाच खात राहणे, अजिबात न खाता उपाशी राहणे आणि भेसळयुक्त अन्न खाणे किंवा जहाल कीटकनाशक फवारलेल्या भाज्या, धान्य खाणे किंवा केमिकलयुक्त साखर खाणे ही विकृत किंवा चुकीच्या आहाराची उदाहरणे आहेत, की ज्यामुळे पुढे भविष्यात आजार उद्भवू शकतात. वैयक्तिक जीवनात मनावरील सत्व- गुणाचा प्रभाव कमी झाला आणि रज आणि त्याहीपेक्षा तम गुणाचा प्रभाव वाढला, की लोभ, मोह, क्रोध, अहंकार हे गुण वाढीस लागतात. त्यातून पुढे अपराधांची मालिका सुरू होते. बुद्धीच्या जोडीला सत्व गुण असताना हे सहसा घडत नाही. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी अणू विभाजनाचा आणि अणुउर्जेचा शोध लावला. पुढे दुसर्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने या तंत्राचा वापर करून अणुबॉम्ब बनवण्यास सुरुवात केली. त्याला मात्र या सत्शील शास्त्रज्ञाने कडाडून विरोध केला. कदाचित कुठून ही बुद्धी मला झाली असेही त्याला वाटले असेल., परंतु त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा अहंकार, असूया आणि वर्चस्वाचा हव्यास यापायी त्यांनी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुस्फोट केले आणि पुढची विदारक परिस्थिती आपणास ज्ञात आहेच. काही वेळा अपघाताने होणारी वायुगळती ही सुद्धा एका अर्थाने मानव निर्मितच म्हणावी लागेल. माणसाच्या बुद्धीचा विकास जस जसा होत गेला तशी त्याची संशोधक वृत्ती वाढत गेली. त्यातून त्याची वैयक्तिक आणि सामाजिक उन्नती निश्चितच झाली., परंतु ती होत असताना बर्याचदा निसर्गनियम बाजूला सारले गेले. अगदी अलीकडच्या काळात मेट्रो प्रकल्पासाठी झालेली वृक्षतोड हे बोलकं उदाहरण म्हणावे लागेल. धरणांमुळे भारत सुजलाम सुफलाम झाला हे कितीही खरे असले तरी धरणे बांधत असताना अनेक गावं उद्ध्वस्त झाली तर धरणाच्या संभाव्य पाणीसंचय क्षेत्रात सुद्धा राजकीय वरदहस्तामुळे अतिक्रमणे झाली. काही ठिकाणी बरीच वर्षे तेथे पाणी न साठल्याने वस्त्याही झाल्या आणि अचानक अतिवृष्टीच्या काळात या क्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. हा प्रज्ञापराधाचाच परिणाम म्हणावा लागेल. अगदी गरजेसाठी असेल नाही तर स्वार्थासाठी असेल परंतु मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. जंगलेच्या जंगले उद्ध्वस्त झाली हे सत्य नाकारता येणार नाही. वृक्ष लागवड किंवा वनीकरण त्या प्रमाणात झाले का? लागवडीनंतर त्यांचे संवर्धन होऊन ते वृक्ष या अवस्थेपर्यंत पोहोचले का? का पुन्हा ते मोठे होण्याच्या आधीच तोडले गेले? हा सर्व संशोधनाचाच विषय आहे. वृक्षारोपणावर आपल्याकडे अतोनात पैसा खर्च होतो. परंतु त्या प्रमाणात वृक्षसंपदा आपल्याकडे आहे का? दरवर्षी त्याच त्या खड्ड्यात वृक्षारोपण करणार्या महान व्यक्तीसुद्धा आपल्याकडे आहेत. परिणामी पर्जन्यमान आणि तापमानावर त्याचा इतका विपरीत परिणाम झाला आहे आणि तो झपाट्याने बदलणे आता खूप अवघड आहे. नैसर्गिक आपत्तीचे हेही एक कारण आहे.
वाहनांचे धूर, फटाक्यांचे धूर, औद्योगिक वसाहतीतून निघणारे रासायनिक धूर, प्राणघातक वायू या सर्वांमुळे होणारे वायु- प्रदूषण तर आत्ताच्या प्रस्थापित समाज व्यवस्थेत नित्याचे आणि अपरिहार्य होऊन बसले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे त्याच्या नियंत्रणाला प्रचंड मर्यादा आल्या आहेत.
प्रज्ञापराध करणे हा जणू माणसाचा जन्मसिद्ध हक्कच आहे अशी परिस्थिती आहे. एक चूक सुधारताना दुसरी केव्हा होते हे समजतही नाही. ध्वनिप्रदूषण नको म्हणून कायद्याने डॉल्बी सिस्टिमवर बंदी आणली. पण पर्याय म्हणून एका गणपतीपुढे 50-50 ढोल, 20-20 ताशे, झांजा वाजू लागल्या. हा चांगला बदल म्हणायचा, की दुसरा प्रज्ञापराध याचा विचार तथाकथित धर्म मध्ये न आणता सकारात्मक दृष्टीने आपणच करायला नको का?
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. लोकसंख्या जशी जशी वाढत गेली तशी अन्नधान्याची कमतरता भासू लागली. या समस्येवरही बुद्धिमान मनुष्याने संशोधनाने मात केली. कृषिक्षेत्रात क्रांती झाली असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी निसर्गनियम, माणसाचे आरोग्य, प्रत्यक्षात असलेली गरज आणि अर्थकारण, राजकारण यांना कसे कसे प्राधान्य दिले जाते हे महत्त्वाचे नाही का? फर्टिलायझर कंपन्यांना पोसण्याकरिता जहाल विषारी कीटकनाशके किंवा रासायनिक खते यांना प्राधान्य देऊन किंवा त्यांचा प्रचार करून जर शेती उत्पन्न वाढवले जात असेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरते आणि याचा प्रत्यय आपण सर्वजण घेत आहोत, नव्हे त्याच्या दुष्परिणामांचे आपण बळी आहोत ही वस्तुस्थिती आहे. आता जैविक शेतीकडे वळा म्हणून ओरडतं आहेत किंवा जैविक खते किंवा जैविक रसायने यावर संशोधन सुरू केले आहे. हेच सर्व राजकारण आणि अर्थकारण बाजूला ठेवून सुरुवातीलाच केलं असतं तर निश्चित लोककल्याणकारक ठरलं असतं.अन्न- घटकांच्या जुन्या प्रजाती किंवा नैसर्गिक बेणी यांची जोपासना आणि संवर्धन करण्यापेक्षा संशोधनाची झिंग चढलेल्या मनुष्याला मी काही तरी वेगळं करून दाखवलं याचाच दुराभिमान जास्त होऊ लागला. पूर्वी बोराचा आकार हा लहान होता, प्रमाणित होता. माणसाने संशोधन करून आता तो इतका मोठा केलाय, की बोर आहे की पेरू हे समजत नाही. अनेक फळांचे, फळभाज्यांचे आकार, रंग बदलले आहेत. बिया नसलेली फळे उत्पन्न झाली आहेत तसेच पूर्वीच्या काळी आलेल्याच पिकातील दाणेदार, मोठ्या आकाराची कणसं बाजूला काढून, वाळवून, टांगून ठेवत असत आणि त्याचा उपयोग पुढील वर्षी बेणं म्हणून केला जायचा. आता मात्र दरवर्षी नव्यानी बेणं विकत आणायला लागतं. याचाच अर्थ असा, की आलेल्या धान्यात आता पुनरुत्पादन क्षमता राहिलेली नाही. शरीरात पेशींची अतिरिक्त वाढ होणे या स्वरूपातील कॅन्सरसारखे भयानक व्याधी किंवा नपूंसकत्व, संतती नसणे, स्थौल्य, थायरॉईड यासारख्या व्याधींचे वाढते प्रमाण आणि ही संशोधित अन्नद्रव्ये याचा काही संबंध आहे का याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. अन्नाद् पुरुष: असे मार्मिक सूत्र आयुर्वेदात सांगितले आहे, ज्या प्रकारचे अन्न मनुष्य खातो त्या प्रकारे त्याच्या शरीराची जडणघडण होत असते. पूर्वीच्या लोकांच्या बोलण्यात नेहमी एक वाक्य आपण ऐकतो, की आत्ताच्या धान्यात काही कस राहिला नाही. पूर्वीच्या लोकांची धाटणी आणि आत्ताच्या लोकांची धाटणी यात निश्चित फरक आढळतो. देशी गाईचे दूध, तूप आणि संकरित गाईचे दूध, तूप यावर अलीकडे संशोधन व्हायला लागले. मधल्या काळात अनेक आजार त्याने उत्पन्न केले हे विसरून चालणार नाही. शाकाहारी गाईला मांसाहार खायला घालून तिचे मांस वाढवण्याच्या नादात उत्पन्न झालेले मचरव उेुफ प्रकरण म्हणजे प्रज्ञापराधाची परिसीमाच म्हणावी लागेल. मी चंद्रावर गेलो, मी अंतराळात कृत्रिम ग्रह सोडले, मी अनेक आजारांवर मात केली, मी एवढा प्रगत झालो की मी आता काहीही करू शकतो हा अहंकार माणसाच्या मनात स्थिरावत असतानाच एखादी त्सुनामी येते. एखाद्या ठिकाणी ढगफुटी होते आणि एका क्षणात निसर्ग मानवाला जाणीव करून देतो, अरे तू माझ्या शक्तीपेक्षा मोठा नाहीस.
हे सर्व इथे सांगण्याचे कारण काय आणि आजच्या परिस्थितीशी त्याचा संबंध काय असे वाटण्याची कदाचित शक्यता आहे., परंतु ही अवस्था अशी अचानक येत नाही. प्रज्ञापराधाने प्रेरित अधर्माचरणाचे अनुकरण सातत्याने होते त्यावेळी वायू, जल, देश आणि साक्षात काल या जगद् धारणीय घटकांचे संतुलन बिघडते, ते दुष्ट होतात आणि परिणामी एखादी प्रलयकारी घटना घडते. त्यातून सावरण्यासाठी जी प्रतिकारशक्ती माणसाला आवश्यक असते तीसुद्धा अधर्माचरणाने कमी झालेली असते त्यामुळे खरा अनर्थ घडतो. आरोग्य संकट आल्यानंतर कोणत्याही मार्गाने तातडीने तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवू शकत नाही. तुमच्या सद्य स्थितीतील एकंदरीत क्षमतेवरच तुम्हाला ही लढाई लढावी लागणार आहे. परंतु भविष्यातही अशी संकटे येण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण कोणता धर्म पाळायचा हे कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. आयुर्वेदशास्त्र गेली अनेक वर्ष हे सांगत आले आहे, आता तरी ते दुर्लक्षून चालणार नाही. जुने जावू द्या मरणालागून असे न म्हणता जुने ते सोने असे म्हणण्याची वेळ आली आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गाचा अंतिम नियम मानावाच लागेल. अधर्माने वागून हे चक्र गतिमान किंवा बाधित करून अकालमृत्यू ओढवून घेण्याचा करंटेपणा आपण करू नये असे वाटते. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय संशोधनामुळे आपले आयुर्मान जरी वाढलेले दिसले तरी ते फसवे आहे. कारण त्यात निरामयतेचा अभाव आहे. डार्विनच्या उत्क्रांतीवादाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. डार्विनने त्यावेळी सांगितले की निसर्गाशी जुळवून घेऊन ज्या जैव प्रजाती राहतील त्याच पुढे काळाच्या ओघात टिकून राहतील आणि उत्क्रांत पावतील. ज्यांना हे जमणार नाही त्या प्रजाती कालांतराने नष्ट होतील. येथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाची आहे, की जैव प्रजातींनी निसर्गाशी जुळवून घ्यायचे आहे, निसर्गाला बदलण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. आयुर्वेद शास्त्रानुसार सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, आचारसंहिता, सद्वृत्त पालन, आहार-विहारासंबंधी सांगितलेले नियम जर आपण सर्वांनी समजून घेतले आणि त्यानुसार आचरण केले तर आपण निश्चित उत्तम आरोग्य प्राप्त करू शकू. अजूनही वेळ गेलेली नाही. राजकारण, प्रशासन, प्रस्थापित व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे सर्व बाजूला सारून प्रत्येक सामान्य माणसाने स्वत:च्या मर्यादेत जरी हे केले तरी आपण यापुढेही निरोगी दीर्घायुष्याच्या वाटेवर सुखाने मार्गक्रमण करू यात शंका नाही.
– वैद्य अनंत स. निमकर मोबा. 9422038524