५० गावांमध्ये प्रत्येकी २० खाटांची कोरोना काळजी केंद्रे


स्थैर्य, सिंधुदुर्गनगरी, दि.३०: 38 प्राथमिक आरोग्य केंद्र असणाऱ्या गावांमध्ये आणि 5 हजारपेक्षा जास्त  लोकसंख्येच्या 12 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्र निर्माण करून 1 हजार नव्याने खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्याचबरोबर एचआरसीटी चाचण्यांचे दर ठरविण्यात आले असून ठरविण्यात आलेल्या दरांपेक्षा जास्त दर घेणाऱ्यांची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करावी. निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिला.

पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत तसेच तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत आणि मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पुढील आठ दिवसात नव्याने 1 हजार खाटांचे कोरोना काळजी केंद्रांची निर्मिती करण्यात येईल. प्रतिबंधात्मक क्षेत्र पोलीसांनी कडक करावेत. एचआरसीटीच्या 16 स्लाईस चाचणीसाठी 2 हजार रुपये, 16 ते 64 स्लाईससाठी 2 हजार 500 रुपये आणि 64 स्लाईसच्या पुढे 3 हजार रुपये दर जिल्ह्यासाठी राहील. यापेक्षा जादा दर घेतल्यास संबंधितांनी तक्रार करावी. औषध दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणही करण्यात यावे.

निसर्ग वादळातील नुकसान भरपाईचे वाटप

निसर्ग वादळातील बाधीतांसाठी आलेल्या मदतीचे वाटप झाले असून, बाधीत व्यक्ती आणि बाधित कुटुंब मदतीपासून वंचित राहीले नाहीत. शासनाचे विभाग यांचे कदाचित पैसे राहिले असावेत. असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी याबाबतचा आढावा घेऊन सांगितले.

तोक्तेसाठी 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपये जिल्ह्याला मिळणार

72 कोटी रुपये एसडीआरएफ आणि  एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मिळणार होते. परंतु हे निकष बदलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला त्यामुळे 252 कोटींची भरीव तरतूद कोकणाला मिळाली आहे. 17 कोटी 35 लाख 96 हजार 300 मिळणार होते. त्याऐवजी 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपये तोक्ते वादळाच्या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला मिळणार आहेत. चक्रीवादळामुळे पूर्णतः बाधीत घरे 88, 15 टक्क्यांमध्ये 6 हजार 196  बाधीत घरे. 25 टक्क्यांमध्ये 2 हजार 361 घरे बाधीत झाली आहेत. तर 50 टक्क्यांमध्ये 438 घरे बाधीत झाली आहेत.

प्रत्येक तालुक्याला 5 कटर

पालकमंत्री श्री. सामंत यांनी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, तोक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहेच. प्रत्येक तालुक्याला 5 कटर, वन खात्याला दोन असे एकूण 50 कटर नव्याने खरेदी करावेत. अशी सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी केली.

9 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 9 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!