दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२३ । गडचिरोली । लोकसंख्या व तरुणाईचा फायदा घेऊन चीन, अमेरिका यांसारखे देश विकसित झाले. भारताने जर येथील तरूणांचे योगदान वाढविले, येथील लोकसंख्येचा फायदा घेतला तर भारतही विकसित राष्ट्र बनेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उद्योगांना मनुष्यबळ हवे तर तरुणाईला रोजगार हवाय. असे असतानादेखील आपल्या देशात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. म्हणून या ठिकाणी शासनामार्फत दोघांचा दुवा म्हणून कौशल्य प्राप्त तरुणांची निर्मिती करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याकरिता कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असून प्रशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी चालून येतील व बेरोजगारीचे प्रमाण आपोआपच कमी होईल.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेले तरुण तरुणी आहेत. ते पुढे उद्योगांना आपली सेवा पुरवतील. गडचिरोली जिल्ह्यात आता संधी निर्माण होत आहेत. आज गडचिरोली जिल्ह्यात १० पेक्षा जास्त उद्योग आलेले आहेत व येत आहेत. जिल्ह्यातील तरुणाईला जास्त संधी उपलब्ध होत असून पुढच्या काळात त्यांना कामही मिळेल. आपल्याकडे असलेल्या खनिज संपत्तीचा उपयोग केला पाहिजे. कोनसरी प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होत आहे. लोह उद्योगात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. लोह उद्योग मोठया प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. यात गडचिरोलीच्या तरुणांना प्राधान्य राहील. त्यातून त्यांना रोजगार प्राप्त होऊन जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल असे ते यावेळी म्हणाले.
तरुणांनी निराश होऊन चालणार नाही. त्यांनी निराश न होता कौशल्य प्राप्त करुन प्रशिक्षण घेतल्यास ते रोजगारात मोठी भरारी घेऊ शकतात असेही ते यावेळी म्हणाले. मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली कुमार आशीर्वाद व युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा तसेच आमदार देवराव होळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन योगेंद्र शेंडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास यंत्रणा गडचिरोली व डॉ. माया राऊत सहायक प्राध्यापक कृषी विद्यापीठ गडचिरोली यांनी केले.