
दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । सातारा । किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ या गळित हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाची तोडणी व वाहतुक वेळेत होण्याच्यादृष्टीने ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचा शुभारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला.
सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरूपात अजित पिसाळ, प्रमोद पिसाळ, सुधीर फरांदे, प्रमोद भोसले, ओंकार मोरे, सिद्धेश मोरे, धनसिंग पिसाळ, बादशहा इनामदार व रमेश तरडे या ऊस तोडणी कंत्राटदारांनी आपला तोडणी वाहतुक करार केला.
श्री. शिंदे यावेळी म्हणाले, तोडणी वाहतुक कंत्राटदारांना आतापर्यंत जो त्रास झाला तो आम्हांलाही माहित आहे. परंतु यापुढील काळात आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची हमी आम्ही देत आहोत. तसेच इतर कारखाने ज्या पद्धतीने पहिला हप्ता देतील त्याच्याप्रमाणेच किसन वीर कारखानाही पहिला हप्ता देणार असून दोनच हप्त्यामध्ये सर्व पैसे दिले जातील, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली. आपण कारखान्याप्रती दाखविलेला विश्वास असाच यापुढील काळातही दाखवुन येणारा गळित हंगाम पुर्ण क्षमतेने चालविण्याचा अध्यक्ष आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाचा मानस असून शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगून सर्व वाहतुक कंत्राटदारांनी आपल्या कारखान्याबरोबर करार करावेत. सन २०२२-२३ चा गळित हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सर्व वाहन मालक, ऊस तोडणी कंत्राटदार या सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीचे अध्यक्ष मानसिंगराव साबळे, उपाध्यक्ष महादेव साळुंखे, संचालक अरविंद कदम, बबनराव साबळे, नानासाहेब कदम, सूर्यकांत बर्गे, यशवंत जमदाडे, माधवराव डेरे, मॅनेजर बी. आर. सावंत, विश्वास डेरे, विठ्ठल कदम, अरविंद नवले आदी उपस्थित होते.