महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून काढली छेड; दोघा सडकसख्याहरींवर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | फलटण |
फलटण शहरातील मुधोजी कॉलेज ते जीवा महाले चौक यादरम्यान एका पदवीच्या तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या युवतीची दोघा दुचाकीस्वार सडकसख्याहरींनी पाठलाग करून छेड काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित युवतीने त्या दोघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आकाश दादासो झेंडे (रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) व ओंकार पोकळे (रा. गोळेवाडी, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत.

या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. १३ मे २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील मुधोजी कॉलेज ते जीवा महाले चौक यादरम्यान फिर्यादी युवती बस स्टॉपकडे रस्त्याने पायी चालत जात असताना अचानक तिच्या पाठीमागून आकाश दादासो झेंडे (रा.वाठार निंबाळकर) व ओंकार पोकळे (रा. गोळेवाडी) हे दोघेजण मोटार सायकलवरून आले व आकाश झेंडे हा युवतीला म्हणाला की, मला तुझ्याशी बोलायचे आहे. त्यावर युवतीने त्यास सांगितले की, माझ्या वडिलांशी बोल. असे म्हणून ती युवती नर्सिंग काँलेजच्या समोरून बस स्टॉपकडे पायी चालत जात असताना आरोपी युवकांनी मोटारसायकलवरून युवतीचा पाठलाग केला व ती बसमध्ये चढल्यानंतर ते दोघेजण तिच्याकडे रागाने पाहत जोरात मोटारसायकलवरून निघून गेले, अशी तक्रार फिर्यादी युवतीने पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार काकडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!