
थेट WhatsApp वर मिळवा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांसाठी नमुना प्रश्नपत्रिका आणि गुणदान योजना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २२ सप्टेंबर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्षातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांसाठी नमुना प्रश्नपत्रिका (Sample Question Papers) आणि गुणदान योजना (Marking Scheme) अधिकृतपणे जाहीर केली आहे. १०वी आणि १२वीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी आता मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ cbseacademic.nic.in वर जाऊन सर्व विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात.
परीक्षा पद्धत आणि गुणदान रचना
विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, प्रश्नांचे प्रकार आणि गुणांची विभागणी सहज समजता यावी, यासाठी सीबीएसईने ही प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी मूल्यांंकन पद्धतीत आणि उत्तीर्ण होण्याच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. नमुना प्रश्नपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष परीक्षेची तयारी करणे अधिक सोपे होणार आहे.
प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
विद्यार्थी आणि शिक्षकांना मंडळाच्या अधिकृत पोर्टलवरून विषयानुसार प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची रचना पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करता येईल. शाळांना या नमुना प्रश्नपत्रिकांचा वापर वर्ग अध्यापनात आणि विद्यार्थ्यांच्या सरावासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच मंडळाकडून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.