दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्हाधिकारी पदी नुकतेच रुजु झालेले रुचेश जयवंशी यांचे स्वागत व तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा निरोप समारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.
स्वराज्याची राजधानी सातारामध्ये काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, स्वराज्याच्या राजधानीत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुरु केलेले काम यापुढेही सुरु ठेवणार आहे. शासनाच्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर माझा भर राहणार आहे. पर्यटनाबरोबरच दिव्यांगांसाठीही उल्लेखनीय काम करण्याचा प्रयत्न राहील. ज्या प्रमाणे शेखर सिंह यांना प्रशासकीय कामात सहकार्य केले त्याच प्रमाणे या पुढेही सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.