

१९७१ च्या युद्धातील शौर्यासोबतच राष्ट्रनिर्मिती, पर्यावरण, शिक्षण आणि समाजसेवेतील अजोड योगदानाचा गौरव
स्थैर्य, पुणे, दि. ४ जून : भारतीय सैन्यदलाचे माजी अधिकारी आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धातील युद्धवीर कर्नल विनोद मारवाह (निवृत्त) यांना त्यांच्या राष्ट्रनिर्मिती, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि माजी सैनिकांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नुकतेच प्रतिष्ठित ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. भारतीय सैन्यदलाचे प्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते पुण्यात आयोजित एका विशेष आणि दिमाखदार समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
१९७१ च्या युद्धातील शौर्य आणि लष्करी कारकीर्द
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथील १९६७ च्या बॅचचे विद्यार्थी असलेले कर्नल मारवाह हे भारतीय सैन्यदलातील गौरवशाली युद्धवीर आहेत. “Born to Battle” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनडीएच्या ३८ व्या कोर्सचे ते अभिमानास्पद सदस्य आहेत. १९७१ मध्ये ‘बॉम्बे सॅपर्स’मध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भारत-पाक युद्धात पश्चिम सीमेवर अत्यंत पराक्रमी आणि सक्रिय सहभाग नोंदवला होता.
पर्यावरण, कृषी आणि उद्योजकता
१९९२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपले कार्य थांबवले नाही. शिक्षण, अक्षय ऊर्जा, आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम उभे केले. मुंबई-पुणे महामार्गावरील पहिली ‘सोलर ड्रिप इरिगेशन’ (सौर ठिबक सिंचन) प्रणाली उभारण्याचा बहुमान त्यांना जातो. सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू भागांचे पुनरुज्जीवन, जलसंधारण आणि वृक्षारोपणासाठी ते सतत कार्यरत राहिले. याशिवाय ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स’, ‘Magnesia Chemicals’, ‘Arista Chemicals’ अशा उद्योगांच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत विकास साधला आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्रात त्यांच्या या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होत असून, दररोज तब्बल ६ लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते.
जागतिक पातळीवरील मोहिमा व माजी सैनिकांचे पुनर्वसन
‘Horizon OPCEM’ या संस्थेशी संलग्न राहून कर्नल मारवाह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेत दहा वर्षे ‘मानवतावादी डिमायनिंग’ (Humanitarian Demining – भूसुरुंग निकामी करणे) प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे राबवला. सध्या त्यांची टीम कुवेतमध्ये युद्धानंतर उरलेल्या माईन्स आणि स्फोटके हटविण्याचे अत्यंत धाडसी आणि जोखमीचे काम करत आहे. या जागतिक उपक्रमांमधून त्यांनी अनेक माजी सैनिकांना रोजगाराच्या नवीन संधी आणि पुनर्वसन उपलब्ध करून दिले आहे.
शिक्षण आणि समाजसेवा
सन २००० मध्ये त्यांनी पुण्यात ‘IIEBM’ या व्यवस्थापन संस्थेची स्थापना केली. मूल्यआधारित शिक्षण देण्यासोबतच या संस्थेमार्फत संरक्षण दलातील जवानांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय ‘Col. Vinod Marwaha Foundation’ आणि ‘Taarruf Cultural Foundation’ च्या माध्यमातून ते आरोग्य, शिक्षण आणि भारतीय भाषा, साहित्य, काव्यपरंपरेचे जतन करण्याचे अनमोल कार्य करत आहेत.
यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कर्नल मारवाह यांच्या या अफाट कार्याचे भरभरून कौतुक केले. “माजी सैनिकांचे अनुभव आणि सेवा वृत्ती समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असते. राष्ट्रनिर्मितीत त्यांचे हे योगदान अमूल्य आहे,” असे गौरवोद्गार जनरल द्विवेदी यांनी काढले.