जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात रंगणार चुरस; दुरंगी लढत होण्याची शक्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 28 जुलै 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत करण्यात आली. त्यामध्ये फलटण तालुक्यातील सर्व गट हे सर्वसाधारण खुले झाले असून कोळकी व वाठार निंबाळकर या दोन गटांसाठी ‘सर्वसाधारण महिला’ असे आरक्षण निश्‍चित झाले आहे. फलटण तालुक्यातून एकूण 9 सदस्य सातारा जिल्हा परिषदेवर निवडून जाणार आहेत. त्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दिग्गज नेत्यांपैकी कोणाला संधी मिळणार तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मुसंडी मारणार का ? याबाबतची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणूकीत फलटण तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, श्रीमंत विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे असे दिग्गज नेते निवडणूकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यासोबतच राष्ट्रवादीकडून युवा नेतृत्व म्हणून श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर किंवा श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल सुरु करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सातारा जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, तुकाराम शिंदे, अमित रणवरे, संदीप शिंदे, संतोष गावडे – पाटील, रणजीत शिंदे, नानासो उर्फ पिंटू इवरे, माउली सावंत हे दिग्गज नेते निवडणूकीच्या आखाड्यात दिसतील, अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

यासोबतच तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील व युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील यांची नक्की भूमिका काय असणार ? ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरणार कि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गत निवडणुकीच्या वेळी युवा नेते दिगंबर आगवणे हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात बरोबरीने कार्यरत होते. त्यांनतर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व दिगंबर आगवणे यांच्या मधील पूर्वीचे सख्य आता राहिले नाही. त्यामुळे फलटण तालुक्यातील राजकारणात आता दिगंबर आगवणे यांची नक्की भूमिका काय असणार? हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. दिगंबर आगवणे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीला स्वतंत्र पॅनेल टाकून निवडणूक लढवणार का ? याची चर्चा सुद्धा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

युवा नेते सह्याद्री कदम हे सध्या तालुक्याच्या राजकारणात चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. सह्याद्री कदम यांना माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचा मोठा वारसा आहे. स्व. चिमणराव कदम यांच्या विचाराचा गट आजही फलटण तालुक्यात सक्रीय राजकरणात आहे. जरी स्व. चिमणराव कदम यांच्या गटातील नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश करून राजकीय वाटचाल सुरु ठेवली असली तरीसुद्धा आजही गटातील कार्यकर्ते हे स्व. चिमणराव कदम यांच्या विचारानेच कार्यरत आहेत. पूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करून सह्याद्री कदम हे पुन्हा तालुक्याच्या राजकारणात सक्रीय राहणार का ? सत्ताधार्यांशी बस्तान बांधून आपले राजकीय पाऊल सत्तेत ठेवणार कि पहिले पाढेच पुन्हा गिरवले जाणार ? याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

या सर्व घडामोडींचा विचार करता जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे सर्व गट हे खुले झाल्याने सगळ्या गटांमध्ये सर्वच राजकीय पक्ष ताकदीने उमेदवार उतरवणार व जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी वाटचाल करणार हे मात्र नक्की आहे. त्याचबरोबर सदर लढत नेहमीप्रमाणे राजे गट विरुद्ध खासदार गट यांच्यात होणार कि अन्य तिसर्या आघाडीचा पर्याय जनतेसमोर असणार याकडेही तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!