
दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग, एन.सी.सी,समानसंधी केंद्र,इंग्रजी व विद्यार्थिनी वसतिगृह यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा.श्रीरंजन आवटे यांचे व्याख्यानाचे आयोजन,तसेच प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे मी भारतीय कवितासंग्रहाचे प्रकाशन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले होते. याच कार्यक्रमात नुकतेच ज्याला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, अशा छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात शिकणाऱ्या एम.ए.भाग १ मधील विद्यार्थी रोहित बनसोडे याचा सन्मान रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. तसेच रोहित बनसोडे यांची बहीण रक्षिता हिलाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोहित आणि रक्षिता यांनी गोंदवले परिसरात ५००० पेक्षाही जास्त झाडे लावून त्याचे संवर्धन केले आहे. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कॉलेजच्या मराठी विभागाने आपल्या विद्यार्थ्याच्या विधायक कृतीचा गौरव करून अनेकांना प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांचा सन्मान केला. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सत्कारास उत्तर देताना रोहित म्हणाला की’ सातारा जिल्हयात एकीकडे महाबळेश्वर ,पाचगणीकडे हिरवीगार चादर ,तर माण खटाव चा परिसर दुष्काळग्रस्त अशी परिस्थिती होती. २०१७ मध्ये अमीरखान यांनी सत्यमेव जयते या कार्यक्रमात प्रयत्नवादी चिमणीची कथा सांगितली होती. माझा जन्म २००२ ला दुष्काळात झाला.सततच्या दुष्काळाने आमचे जीवन हैराण झालेले.दुष्काळ बघत बसण्यात अर्थ नव्हता. चिमणीची गोष्ट ऐकून मी स्वतःहून खड्डे खोदुन झाडे लावण्याचे ठरवले .मी माळावर सतत चार पाच दिवस काम केल्यामुळे माझ्या हाताला फोड आले .आजारी पडलो .मी झोपून राहिलो होतो .वडिलाना संशय आल्याने हा पोरगा कामाला कुठे जातो काय म्हणून विचारणा झाली.शेवटी मी काय करतो हे त्यांना सांगितले.वडिलांनी काम बघितले .तहसीलदार यांनी देखील काम बघितले. ग्रामीण परिसरात तरस ,लांडगे कोल्हे यांची भीती होती. माझी बहीण रक्षिता हिने देखील माझ्या सोबत राहून काम केले. ३५ चर खोदले.एक छोटा तलाव तयार केला. त्यावेळी हे काम कोणीही गावात करीत नव्हते ..पाउस पडल्यावर पावसाचे पाणी साचले .वन अधिकारी यांनी कौतुक केले. पाच वर्षात मी पाच कोटी लिटर पाणी अडवून जमिनीत मुरवले . आपले काम आपण करायचे ठरवले .खूप उन लागायचे . उनामुळे पक्षीही मरत.२०१७ साली वड ,पिंपळ ,कडूनिंब ,जांभळ अशी झाडे लावली .तेलाच्या फुटक्या डब्यातून पाणी आणून जगवली. पाच वर्षात मी ९००० झाडे उभी केली .जिथे कुसळ उगवत नव्हते तिथे झाडे उभी राहिली. आता गवा ,काळवीट यायला लागली.घुबडे आहेत. प्राण्यांना प्यायला पाणी नाही हे दिसले.एका ओलसर जागी एक वर्ष खोदले. विहिरीला पाणी लागले. आम्ही शिक्षण घेत केवळ गावातच नाही आणखी काही गावात काम करतो. दहिवडी येथे डबल पदवीसाठी मी शिकत होतो .प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी मला पदव्युत्तर एम.ए .मराठी छत्रपती शिवाजी कॉलेजला प्रवेश घेऊन दिला .जीवनात आपण काहीतरी दिले पाहिजे.दिल्याशिवाय मरू नये. रोहित रक्षिता हे काम करताना कधीच थांबणार नाहीत असा निर्धार त्याने बोलून दाखविला. व आपण सर्वांनी झाडे लावावीत असे आवाहन केले. रोहितच्या भाषणानंतर ,विद्यार्थिनी ,सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी त्याची भेट घेऊन अभिनंदन केले.