दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांची शाळा शिवाजीनगर, फलटण या शाळेमध्ये गोरे कुटुंबियांनी श्रीमती कमल कृष्णाजी गोरे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी डॉ. साईश भुजबळ तसेच उज्ज्वला गोरे यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. श्रीमती कमल गोरे व डॉ. भुजबळ यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप चोरमले यांनी केला. तसेच उज्ज्वला गोरे यांचा सत्कार सौ. सुनीता गायकवाड यांनी केला.
यावेळी कमल गोरे म्हणाल्या, मतिमंद मुलांना सांभाळणे, शिकवणे हे खूप अवघड काम आहे. त्यांनी नोकरी करत असतानाचे काही किस्से सांगितले. एक आदर्श शिक्षिका म्हणून अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलं. हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी पार पाडले आहे. गोरे मॅडम यांनी शाळेतील मुलांची आस्थेने चौकशी केली. संस्था आणि शाळेतील शिक्षक खूप चांगलं काम करत आहेत, असेही त्या म्हणाल्या आणि या शाळेला मी नेहमी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढदिवसाच्या निमित्ताने कमल गोरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना थंड पाण्याचा कुलर तसेच शाळेतील सर्व मुलांना दप्तर (सॅक) भेट स्वरूपात दिली. मुलांना त्यांनी खाऊ आणला होता. त्यामुळे शाळेतील सर्व मुले खूपच उत्साही आणि आनंदी होती.
कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष संदीप चोरमले यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमावेळी विद्यार्थी, पालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. मुख्याध्यापक रमेश लालसरे, अमितकुमार राऊत, सौ. सुनीता गायकवाड, सौ. गिरणा पवार, सौ. वंदना धाराशिवकर यांचे सहकार्य लाभले.
अमितकुमार राऊत यांनी आभार मानले.