

स्थैर्य, सातारा, दि. ५ जून : कोयनानगर परिसरातील कोयना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाटण तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शोधमोहीम राबविल्यानंतर या दोन्ही मुलांचे मृतदेह प्रशासनाला सापडले आहेत.
पाण्यात बुडून मृत्यू झालेली दोन्ही मुले पाटण तालुक्यातील गाढखोप येथील रहिवासी होती. त्यांचे वय अनुक्रमे १६ आणि १४ वर्षे होते. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने ते नदीच्या खोल पाण्यात गेले आणि तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून ताब्यात घेण्यात आले असून प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे गाढखोप गावासह संपूर्ण पाटण तालुक्यात शोककळा पसरली आहे. ऐन तरुण वयात मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पोहण्यासाठी नदी, धरणे किंवा इतर कोणत्याही खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.