महाबळेश्वर आगारात दाखल झालेल्या नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसच्या आसनरचनेवरून प्रवाशांमध्ये नाराजी


स्थैर्य, सातारा, दि. ५ जून : महाबळेश्वर आगाराला नुकत्याच ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बस देण्यात आल्या आहेत. मात्र, या बसमधील आसनरचनेवरून प्रवाशांमधून संमिश्र प्रतिक्रिया आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या बस ३ बाय २ आसनरचनेच्या असल्याने मधला रस्ता अरुंद झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

नव्या बसमध्ये चालकाच्या बाजूला तीन आसनांचे बाकडे तर वाहकाच्या बाजूला दोन आसने अशी रचना करण्यात आली आहे. तीन आसनांच्या रांगेत बसताना प्रवाशांना दाटीवाटीचा सामना करावा लागत आहे.

या अरुंद जागेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना बसमध्ये ये-जा करण्यासाठी आणि बसताना पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथून लांब पल्ल्याच्या मार्गांवर या बस कितपत उपयुक्त ठरतील, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या बसची रचना मिनी ट्रॅव्हल्ससारखी करण्यात आली आहे.

घाटमाथा आणि लांब अंतराच्या प्रवासासाठी या बसचा टिकाऊपणा कसा राहील, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने काही आगारांमध्ये सुरू केलेल्या मिनी बस सेवा फार काळ टिकल्या नव्हत्या, याची आठवण काही प्रवासी करून देत आहेत.

यामुळेच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा प्रत्यक्ष टिकाऊपणा आणि कामगिरीचा कस आगामी काळात लागणार आहे. या बसची देखभाल कशी ठेवली जाते आणि घाट रस्त्यांवर त्या कशा धावतात, यावर त्यांचे यश अवलंबून असेल.

प्रवाशांना नव्या वाहनांचा आणि आधुनिक सुविधांचा लाभ मिळत असल्याने या बसचे स्वागतही होत आहे. तरीही एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सूचना विचारात घेऊन आसनरचना आणि जागेबाबत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!