

स्थैर्य, सातारा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले अजिंक्यतारा येथील चारभिंती टेकडीवर वृक्षसंवर्धनासाठी पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. बिल्डर्स असोसिएशन सातारा आणि हरित सातारा फ्रंट वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
किल्ल्यावरील मंगळाई परिसरातील चारभिंती टेकडीवर ही पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या माध्यमातून किल्ला आणि परिसरातील वृक्षसंपदेचे संगोपन व संवर्धन केले जाणार आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला.
या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण केल्यानंतर भोसले यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज आहे, असे भोसले म्हणाले.
या कार्यक्रमास सातारा पालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक फिरोज पठाण, सुशांत महाजन, रवी पवार, कन्हैयालाल राजपुरोहित, नगरसेविका पूनम निकम आणि मुख्याधिकारी जळक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
वृक्षसंवर्धनासाठी उभारण्यात आलेली ही पाण्याची टाकी भविष्यात किल्ला परिसरातील हरित क्षेत्र वाढविण्यास मोठी मदत करणार आहे. झाडांच्या संगोपनाचा आणि पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
