
दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। फलटण । येथील फलटण नगरपरिषदेमार्फत नगरपालिका हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेणेत आलेली असून त्यामध्ये थकबाकीदारांचे नळ कनेक्शन नगरपालिकेच्या वसुली पथकाकडून बंद करणेत येत आहे. नगरपरिषदेकडून ही कारवाई टाळणेसाठी थकबाकीदार मिळकतधारक यांना त्यांचेकडे असणारी येणेबाकीची रक्क्म नगरपरिषदेकडे भरणा करुन नगरपालिकेला वसुलीकामी सहकार्य करणेचे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांचेमार्फत करणेत आले आहे.
सध्या 2024-2025 ची वर्षअखेर सुरु असून काही मिळकतदारांनी अद्यापही मिळकतकराची रक्कम भरलेली नाही. वसुलीकामी पालिका कर्मचारी यांची 11 वसुली पथके विभागनिहाय तयार केलेली आहे. ही पथके नागरीकांच्या घरोघरी जावून मिळकत कर भरणा करण्यासाठी नागरीकांकडून वसुली करीत आहेत. नगरपरिषदेमार्फत थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई सुरु आहे. तसेच नगरपरिषदेचे मालकीचे शॉपिंग सेंटरमधील थकबाकीदार गाळेधारक यांचे ताब्यातील दुकानगाळे सील करुन ताब्यात घेणेची कार्यवाही सुरु करणेत आलेली आहे.
नगरपालिकेमार्फत थकबाकीदारांना आवाहन करणेत येते की, त्यांचेकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीची तसेच गाळाभाडेची रक्कम त्वरीत भरणा करावी व जप्ती करणे, नळ कनेक्शन बंद करणे, गाळा सिल करणे या कटू बाबी टाळून नगरपरिषदेस वसुलीकामी सहकार्य करावे.