होळ येथील फलटण-बारामती रस्त्यावरील पूल पाण्याखाली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२६ | फलटण |
मुसळधार पावसामुळे नीरा नदीला मोठा पूर आला असून फलटण तालुक्यातील होळ येथील फलटण-बारामतीला जोडणारा पूल शुक्रवारी सायंकाळी पाण्याखाली गेला. पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वीर धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी होत असून, प्रशासनाने नदीपात्र व पुलाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, वीर धरण प्रशासनाने दुपारी ४ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून ६२,९२४ क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे १,४०० क्युसेक असा एकूण ६३,३२३ क्युसेक विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात येणार्‍या पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नीरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, पूरग्रस्त पुलांवरून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!