बहुजनांच्या संस्थांवर टाच आणण्याचा प्रयत्न भाजपने केला : डाॅ. सुरेश जाधव


 

स्थैर्य, मायणी (जि. सातारा), दि.३० : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून, वरिष्ठ नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण जीव ओतून कामाला लागले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर निश्‍चित विजय होतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी व्यक्त केला. 

येथील जगन्नाथराव जाधव स्मृति विज्ञान भवनात आयोजित पदवीधर व शिक्षक मतदारांच्या बैठकीमध्ये श्री. गुदगे बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजितसिंह देशमुख, दादासाहेब काळे, माजी सभापती अशोकराव गोडसे, बाजार समितीचे सभापती शशिकांत देशमुख, संचालक किरण देशमुख, कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष विवेक देशमुख, विक्रांत लाड, प्रा. चौगुले, मायणी शिक्षण संस्थेचे संचालक दिगंबर पिटके, प्रशांत सनगर आदी मान्यवर उपस्थित होते. 

मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेने दिलेला शब्द प्रमाण मानून काम करतात. शरद पवार यांनी संस्थेला 25 लाख रुपयांची मदत दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, “”आधीच्या सरकारने बहुजनांच्या संस्थांवर टाच आणण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले. सुशिक्षित तरुण बेरोजगार केले. त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊया.” 

रणजितसिंह देशमुख, पोपट मिंड यांनीही मनोगत व्यक्त केले. दादासाहेब कचरे यांनी प्रास्ताविक केले. माजी प्राचार्य इब्राहिम तांबोळी यांनी आभार मानले. बैठकीला मायणी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!