दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२३ । मुंबई । एकीकडे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय गोंधळावर बोलणे टाळले, पण शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्यासोबत शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे काही नेतेही उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आज आम्ही सर्व इथे बाळासाहेब ठाकरेंना वंदन करायला आलो आहोत. हे शक्तिस्थळ आहे, प्रेरणास्थळ आहे. इथे आल्यानंतर उर्जा मिळले, प्रेरणा मिळते. हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय. हे सरकारसुद्धा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही वर्षभरापूर्वी त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन केले.”
“भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी सर्वसामान्यांच्या मनात होते. तेच आम्ही वर्षभरापूर्वी केले. बाळासाहेबांच्या, दिघेसाहेबांच्या आदर्शावर, त्यांनी दिलेल्या शिकवणीवर आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब नेहमी सर्वसामान्यांच्या पाठिशी नेहमी उभे राहायचे, हे सरकारदेखील सर्वसामान्यांच्या पाठिशी उभे आहे. हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे आपले सरकार आहे, अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. हीच आमच्या कामाची पोचपावती आहे,” असं शिंदे म्हणाले.