सांगली-सातारा विधानपरिषदेवर भाजपचा झेंडा! धैर्यशील कदम यांचा २९५ मतांनी दणदणीत विजय; विजयाचा मार्ग सुकर करण्यात रणजितदादांची ‘मास्टरमाईंड’ खेळी!

स्थैर्य, सातारा, दि. २२ जून : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील (दादा) कदम यांनी दणदणीत आणि ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब्बल २९५ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत विधानपरिषदेवर भाजपचे ‘कमळ’ फुलवले आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच मिळवला ‘कोटा’

या निवडणुकीची मतमोजणी अत्यंत एकतर्फी आणि भाजपच्या बाजूने भक्कम राहिली. विजयासाठी आवश्यक असलेला ४४३ मतांचा कोटा धैर्यशील कदम यांनी पहिल्या पसंतीच्या मोजणीतच सहज पूर्ण केला.

  • धैर्यशील कदम (भाजप) – ५९१ मते (विजयी)

  • अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी) – २९४ मते

  • विजयाचे अंतर – २९५ मते

  • अवैध मते – ९

धैर्यशील कदम यांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या ५९१ मतांमुळे त्यांचा विजय प्रचंड मोठ्या फरकाने निश्चित झाला.

विजयाचे ‘शिल्पकार’ रणजितदादाच!

धैर्यशील कदम यांच्या या दणदणीत विजयात माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि निर्णायक ठरले आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी रणजितदादांनी शर्थीचे प्रयत्न केले. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी योग्य समन्वय साधत रणजितसिंह यांनी जी अचूक रणनीती आखली, ती १०० टक्के यशस्वी ठरली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या याच राजकीय नियोजनामुळे धैर्यशील कदम यांच्या विजयाचा मार्ग खऱ्या अर्थाने सुकर झाला, अशीच चर्चा आता संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पोवई नाक्यावर आज भव्य स्वागताचे आयोजन

या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित आमदार धैर्यशील (दादा) कदम हे आज दुपारी ठीक ४:०० वाजता सातारा येथील पोवई नाका (शिवतीर्थ) येथे येणार आहेत. यावेळी ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करणार आहेत.

या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि नवनिर्वाचित आमदारांच्या भव्य स्वागतासाठी सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी आज दुपारी ४:०० वाजता शिवतीर्थ, पोवई नाका, सातारा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!