बेलापूरचे व्यापारी गौतम हिरणच्या खुन्यांना अटक करण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन


स्थैर्य, बेलापूर (जि. अहमदनगर), दि. ८: बेलापूर (जि. अहमदनगर) येथील प्रथितयश व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह 6 दिवसांनी सापडला. पोलीसांच्या निष्क्रियतेमुळेच  हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना असून या अपहरणाचे व खुनाचे सूत्रधार व आरोपी यांना पकडून योग्य शासन होण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख व भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जैन समाज प्रमुख संदीप भंडारी यांनी दिली.

अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व सकल जैन समाज महाराष्ट्र यांनीही या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण झाल्यापासून भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने राज्य सरकारकडे याचा तपास करण्याची आग्रही मागणी केली होती. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन याविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.  जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याप्रश्नी आवाज उठवला होता. दुर्देवाने या प्रकरणाचा पोलीस खात्याकडून वेळीच योग्य तपास न झाल्याने 7 मार्च रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह बेलापूरपासून अवघ्या 10 किलोमीटरवर सापडला. परंतु गेले आठवडाभरापासून तपास करत असलेल्या पोलिस यंत्रणेला या प्रकरणाचा छडा न लावता आल्याने व्यापारी वर्गात, समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

या अपहरणकर्त्या गुन्हेगारांना ताबडतोब शोधून त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा व जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्यावतीने बुधवार दि. 10 मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे ललित गांधी व संदीप भंडारी यांनी जाहीर केले आहे.

यावेळी संपूर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने करण्यात येणार असून स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक व्यापारी बंधुंनी व जैन समाजाने सामील व्हावे तसेच दिवसभर काळ्या फिती लावूनच कामकाज करावे, असे आवाहन करण्यात आले असून आंदोलनाच्या वेळी कोविडसंदर्भातील शासकीय आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!