सावधान! साता-यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने गंडा घालणारी टोळी सक्रिय


 

स्थैर्य, सातारा, दि.२८ : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर नोकरी व टेंडर देण्याचे आमिष दाखविण्याचा जिल्ह्यातील उद्योग एका गुन्ह्यातून समोर आला आहे. या गुन्ह्यातून हिमनगाचे टोक समोर आले आहे. केवळ आमिष दाखविण्यापर्यंत न थांबता बनावट कागदपत्रे तयार करण्यापर्यंतचे धंदे त्यात झाले आहेत. हे प्रकरण थोडक्‍यात कसे थांबेल, यासाठी शहरातील काही बडी मंडळी सक्रिय आहेत. त्यामुळे एकाच्या अटकेवरच न थांबता यामध्ये गुंतलेल्या सर्व महाभागांना समोर आणण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागेल.

श्‍वेता सिंघल जिल्हाधिकारी असल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावण्याचे, तसेच विविध टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवत लोकांकडून पैसे उकळणारी टोळी सक्रिय झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पैसे कसे पोचतात, कसा वाटा असतो अशी या टोळीतील सक्रिय सदस्य संबंधिताला पटवून सांगायचे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांचा बेकायदेशीर फलक लावून या टोळीतील सदस्यांची गाडी साताऱ्यात फिरायची, असेही काही जण सांगतात. सातारा व मेढा भागातील अनेक जण या टोळीच्या भूलथापांना बळी पडले आहेत. त्यातून लाखो रुपयांची कमाई या टोळीने केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनगटात दम असणाऱ्या काहींनी टोळी सदस्यांच्या कॉलरला हात घालून काही पैशांची वसुलीही केली; परंतु मसल पॉवर नसलेल्यांना ही टोळी अनेक भूलथापा देऊन गंडवत होती. या थापांना वैतागलेल्या काहींनी शाहूपुरी पोलिस ठाण्याची पायरीही चढली होती; परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे सिंघल यांच्या कार्यकाळात सुरू झालेला हा उद्योग पुढे शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला तरी सुरू राहिला. नवीन जिल्हाधिकाऱ्यांबरोबरही आमची सेटिंग आहे. तुमची कामे नक्की होणार, असे आश्‍वासन या टोळीकडून फसवणूक केलेल्यांना दिली जात होती. जाणाऱ्या अधिकाऱ्याकडून नवीन अधिकाऱ्याला सर्व काही सांगितले जाते. त्यामुळे निर्धास्त राहा असे जुन्यांना, तर नव्या अधिकाऱ्याशी संबंध प्रस्तापित झाल्याचा दिखावा करत आणखी काही सावज हेरायचा प्रयत्न या टोळीकडून सुरू होता.

पंतप्रधान अहमदाबादमध्ये जायडस बायोटेकच्या व्हॅक्सिन प्लांटमध्ये पोहोचले, येथून हैदराबाद आणि पुण्यतही जाणार

पोलिस ठाण्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड बसलेल्या नागरिकांत नैराश्‍याची भावना यायला लागली होती. त्यातच साताऱ्याचे पोलिस उपअधीक्षक बदलले. नवीन सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या जनता दरबारात हा मुद्दा गेला. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चाललेला हा बाजार त्यांनी गांभीर्याने घेतल्याने टोळीतील एक जण जेरबंद झाला; परंतु अटक केलेल्या एकट्यानेच हा सर्व प्रकार केला आहे, असे फसवणूक झालेल्यांचे म्हणणे आहे. त्यामध्ये साताऱ्यातील आणखी महामाग असल्याचे ते सांगतात. एका निवृत्त अधिकाऱ्याची गाडीही या कामात कशी सामील होती, याचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

केवळ पैशांचे आमिष दाखवूनच ही टोळी थांबलेली नाही. पैसे घेतलेल्या नागरिकांना आश्‍वस्त करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यापर्यंत या टोळीची मजल गेलेली आहे. पैसे दिल्यानंतर नागरिकांचा नोकरी किंवा टेंडर मिळण्यासाठी तगादा लावल्यावर शासकीय सही, शिक्‍यांचा गैरवापर करत त्यांनी काहींना टेंडर, तसेच नोकरीची बनावट ऑर्डर दिल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणामध्ये गुंतलेल्याचा बचावासाठी शहरातील एका “मेहरबाना’च्या नेतृत्वाखाली काही जणांना पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठिय्याही मारला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या या टोळीतील सर्वांचा चेहरा समोर आणण्याचे आव्हान पोलिस दलासमोर आहे.

गुन्हे दाखल न होण्यासाठी प्रयत्न 

फसवणुकीच्या या रॅकेटमध्ये एक गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेले अन्य लोकही सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी त्यांना गुन्हे दाखल करण्याचे आवाहनही केले आहे; परंतु गुन्ह्याची व्याप्ती वाढू नये म्हणून काहींनी फसवणूक झालेल्यांची संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना पैसे परत देण्याचे आमिष दाखविले जात आहे. काहींना वेगळ्या भाषेत समजवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आणखी गुन्हे दाखल करण्यासाठी फसवणूक झालेल्यांना विश्‍वास देण्याचे कामही पोलिसांना करावे लागेल. त्यामुळे आंचल दलाल यांच्याबरोबरच पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनाही या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेवावे लागणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!